गेला कुठे पुणे तुंबल्याचा अहवाल?

By admin | Published: November 27, 2015 01:49 AM2015-11-27T01:49:55+5:302015-11-27T01:49:55+5:30

अवकाळी पावसाने शहराची तब्बल दोन दिवस दुर्दशा केली़ त्यावर अनेक नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले़ आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले़ मात्र, ही चौकशी व अहवालही पावसाबरोबरच गायब झाला आहे.

Where is the report of Pune Tumblas? | गेला कुठे पुणे तुंबल्याचा अहवाल?

गेला कुठे पुणे तुंबल्याचा अहवाल?

Next

पुणे : अवकाळी पावसाने शहराची तब्बल दोन दिवस दुर्दशा केली़ त्यावर अनेक नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले़ आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले़ मात्र, ही चौकशी व अहवालही पावसाबरोबरच गायब झाला आहे. अग्निशामक विभागाने पाणी कुठे-कुठे साचले, याबाबत दिलेल्या अहवालाशिवाय हे पाणी का साचले, त्याला जबाबदार कोण, हे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.
पावसाच्या गायब होण्याबरोबरच आयुक्तांनी दिलेले चौकशीचे आश्वासनही गायब झाले. सलग दोन दिवसांच्या मुसळधार अवकाळी पावसाने पुण्याची दैना केली. विमानतळ परिसर तसेच कळस, विश्रांतवाडी, जयप्रकाशनगर वगैरे परिसरात तर पावसाच्या साचलेल्या पाण्याने धुमाकूळ घातला. या परिसरातील नगरसेवक सतीश म्हस्के यांनी त्यावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठवली. त्यांच्याबरोबरच अनिल टिंगरे, वर्षा तापकीर, वसंत मोरे, योगेश मुळीक, अस्मिता शिंदे आदींनीही प्रशासनाला धारेवर धरले. म्हस्के यांनी तर नागरिकांच्या नुकसानाला अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणारी पालिकाच जबाबदार असून, घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी केली.
नव्याने बांधकाम करताना नाल्यांचे नैसर्गिक वळण अनेक बांधकाम व्यावसायिकांनी स्वत:च्या सोयीनुसार वळविले आहे. त्यामुळेच पावसाचे पाणी साचून ते वस्त्यांमधील घरांत शिरले, असा आरोप करून म्हस्के यांनी काही जणांची नावेही सर्वसाधारण सभेत घेतली होती. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सभेनंतर त्यांनी लगेचच या परिसरात जाऊन पाहणीदेखील केली़ अधिकाऱ्यांना पाहणी करायला सांगून त्वरित अहवाल देण्यास सांगितले होते़ मात्र, पाऊस संपून आता तीन दिवस झाले तरीही ही चौकशी काही झालेली दिसत नाही.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे अग्निशामक विभागाने कुठे-कुठे पाणी साचले, याचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी दिला. या एका अहवालाशिवाय पालिकेच्या कोणत्याही विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असल्याचे दिसत नाही. पाऊस संपला तसेच आयुक्तांचे चौकशीनंतर दोषींवर कारवाईचे आश्वासनही वाऱ्यावरच विरले आहे. घरात पाणी शिरून अन्नधान्याचे नुकसान झालेले नागरिक मात्र आता रेशनिंग कसे भरायचे, या चिंतेत आहेत.
पावसाच्या गायब होण्याबरोबरच आयुक्तांनी दिलेले चौकशीचे आश्वासनही गायब झाले. सलग दोन दिवसांच्या मुसळधार अवकाळी पावसाने दैना केली.
विमानतळ परिसर, विश्रांतवाडी, जयप्रकाशनगर वगैरे परिसरात तर पावसाच्या साचलेल्या पाण्याने धुमाकूळ घातला.

Web Title: Where is the report of Pune Tumblas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.