निराधार वृध्द महिलेच्या मनाची श्रीमंती कुठं अन् खोटं बोलून दोन दोन पाकिटं हडपणारी माणसं कुठं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:34 PM2020-05-07T17:34:51+5:302020-05-07T17:35:14+5:30
जिथे सगळ्यांनी मिळून खाऊ ऐवजी सगळ्यांचं मलाच कस खाता येईल असा विचार करणारी लोक पाहायला मिळतात तिथेच या '' माऊली'' सारखी माणसं पण असतातच की..
पुणे: अनेक लोक खोटे बोलून चक्क दोन दोन पाकिटं घ्यायची तिथे ही आजी फक्त एकच पाकिट व तेही भाजीचेच घेऊन जायची. बळेबळे द्यायचा प्रयत्न केला तर तिचे एक वाक्य अगदी ठरलेलं ‘नको,आणखी कोणाला तरी ते द्या मला एवढं पुरे आहे बाकी मी घरी बनवेल..’
जेवणाची पाकिटं घेणार्यांच्या ७०० ते ८०० जणांच्या गदीर्तील ती एक वृद्धा! फक्त भाजी घ्यायची, घ्याहो आजी असा कितीही आग्रह केला तरी फक्त भाजीच घ्यायची. त्यामुळेच सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर लक्षात राहिलेली.
अनेक लोक खोटे बोलून चक्क दोन दोन पाकिटं घ्यायची तिथे ही आजी फक्त एकच पाकिट व तेही भाजीचेच घेऊन जायची. बळेबळे द्यायचा प्रयत्न केला तर तिचे एक वाक्य अगदी ठरलेलं
‘नको,आणखी कोणाला तरी ते द्या मला एवढं पुरे आहे बाकी मी घरी बनवेल..’
धनकवडीत काही कार्यकर्ते एकत्र येऊन परिसरातील निराधार, निराश्रितांना रोज अन्नदान करतात. मंगळवारी या आजीने एक अनोखी कृती करत या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणीच आणले. तिच्याजवळ असूनअसून असे कितीसे पैसे असणार? होती ती सगळी शिल्लक तिने एकत्र केली आणि त्याची ५ किलो तुरीची डाळ घेऊन ती तुमच्या अन्नदानात माझा गरीबाचा खारीचा वाटा असे म्हणत या कार्यकर्त्यांच्या हवाली केली.
जिथे सगळ्यांनी मिळून खाऊ ऐवजी सगळ्यांचं मलाच कस खाता येईल असा विचार करणारी लोक पाहायला मिळतात तिथे या माऊलीने, जिला दोन वेळच जेवण बनवून खाण शक्य नाहीये ती स्वत:च्या घासातला घास दुसऱ्यांना देण्याचा विचार करती आहे हे पाहून कार्यकर्त्यांना आभाळ ठेंगणे झाले. खरे सांगायचे तर सर्वजण नि: शब्द झाले.
दानशूर व्यक्तींकडून मदत म्हणून आलेली कित्येक शे किलोची पोती खांद्यावर उचलून गोडाउन मधे ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना आजीची ही ५ किलोची तूरडाळ ऊचलणे अवघड झाले, कारण ती फक्त दोन किलोची पिशवी नव्हती, तर त्यात 2000 टनाहून अधिक भरेल एवढं प्रेम होते. असेच काम करा रे बाळांनो म्हणत तिने सगळ्यांच्या गालावर तळहात फिरवत स्वत:च्या कानशिलावर बोटे वाकवली तेव्हा ती कडकट करत एकाचवेळी वाजली व त्या आजीमध्ये शिगोशीग भरलेली माया सगळ्यांच्या प्रत्ययास आली.
कोणाला असं वाटत असेल की मी अमुक एवढा श्रीमंत आहे आणि माझ्याकडे एवढी संपत्ती आहे तर त्या सगळ्यांची सर्वांची श्रीमंती एका पारड्यात आणि या माऊलीची श्रीमंती एका पारड्यात ठेवा. बघा या माऊलीचंच पारडं नेहमी जड राहील.