जिथे पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर पायपीट व्हायची; आता तिथे विहिरी फुल्लं भरून वाहू लागल्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:01 PM2020-08-18T12:01:40+5:302020-08-18T12:04:53+5:30
गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे येथून नागरिक आले आणि त्यांनी येथे काम केले. परिणामी यंदा येथील पाणी साठा चांगला वाढला..
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल-मे महिन्यात उदाचीवाडीमध्ये ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल व्हायचे. परंतु, गेल्या दोन वर्षांमध्ये लोकसहभागातून येथे पाणी जिरविण्यासाठी डोंगर माथ्यावर आणि पायथ्यावर खड्डे तयार करण्यात आले. त्यामुळे आता येथील विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच गतवर्षीच्या पावसाने एप्रिल-मे मध्ये पाणी कमी पडले नाही. हे पाणी जिरविण्याचे झालेले काम पुढच्या पिढीसाठी एक मोठा ठेवा असेल, अशाच भावना येथील ग्रामस्थांच्या आहेत.
उदाचीवाडी येथे पाणी जिरविण्यासाठी पाणी फांउडेशनतर्फे खड्डे खोदण्याचा उपक्रम घेतला. गेली दोन वर्षांपासून तो सुरू आहे. गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे येथून नागरिक आले आणि त्यांनी येथे काम केले. परिणामी यंदा येथील पाणी साठा चांगला वाढला असून, संपूर्ण वाडी पाणीदार बनली आहे. येथील कामाविषयी स्थानिक तरूण नामदेव कुंभारकर म्हणाले,‘‘आमच्या परिसरात २०१८ पासून खड्डे घेण्याचे काम सुरू झाले. गतवर्षी चांगला पाऊस झाला आणि खड्ड्यांमध्ये पाणी जिरले आणि साठले. मी लहान असताना म्हणजे १९९८ साली विहिरीमध्ये एवढं पाणी असायचे की, त्यात पोहता यायचे. पण गेल्या काही वर्षात तो आनंद घेता आला नाही. यंदा प्रथमच आम्हाला विहिरीत पोहता आले. कारण विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. हे काम आता पुढील पिढीसाठी कायमस्वरूपी राहणार आहे.’’
===================
पाणी पाहून कामाचे समाधान
स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या पुण्यातील प्रा. अनुष्का कजबजे म्हणाल्या,‘‘उन्हाळ्यात सुटीच्या दिवशी कुटुंबासह आणि मित्राबरोबर तिथे जाऊन खड्डे खणायचो. त्याचे ‘चिज’ आता झाल्याचे समाधान मिळत आहे. कारण इथे आता सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. असाच उपक्रम प्रत्येक गावात झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाणीदार होईल.’’
==========================
प्रत्येक गावात असे काम व्हावे
गावात एकूण १७६ घरे असून, प्रत्येक घराने सांडपाण्यासाठी शोष खड्डे केले आहेत. त्यामुळे त्यातच सांडपाणी जाते. इतरत्र कुठेही वाहताना दिसत नाही. परिणामी स्वच्छता आपोआप राहते. असाच उपक्रम प्रत्येक गावी व्हायला हवा. तसेच ऊस हे पीक न लावता सीतापळ, अंजीर आणि ज्वारी, बाजरी, वटाणा, कांदा, कोबी असे पीक घेत आहोत.
- नामदेव कुंभारकर, तरूण, उदाचीवाडी