जिथं दहशत, तिथंच शिक्षा...! तोडफोड करणाऱ्या गुन्हेगाराची भर चौकातून काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 02:35 PM2023-07-26T14:35:24+5:302023-07-26T14:35:41+5:30

हॉटेलमध्ये तोडफोड करत लूटमार करणाऱ्या वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली

Where there is terror, there is punishment...! Vandalism criminal removed from Bhar Chowk | जिथं दहशत, तिथंच शिक्षा...! तोडफोड करणाऱ्या गुन्हेगाराची भर चौकातून काढली धिंड

जिथं दहशत, तिथंच शिक्षा...! तोडफोड करणाऱ्या गुन्हेगाराची भर चौकातून काढली धिंड

googlenewsNext

धायरी: हातात कोयता घेऊन दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणे या घटना शहरात वरचेवर वाढत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि जिथे गुन्हेगारांनी दहशत माजवण्याचे प्रकार केले, तेथेच पोलिसांनी त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत. या कामगिरीमुळे हवेली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील हॉटेलमध्ये तोडफोड करत लूटमार करणाऱ्या वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली. आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं सांगत संबंधित गुन्हेगार खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात दहशत माजवित होता. त्या रस्त्यावरून त्याची धुलाई करत पोलिसांनी धिंड काढली. याबाबत अधिक माहिती अशी की, तोडफोड केलेल्या हॉटेल व्यावसायिकाने हवेली पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी सराईत गुन्हेगार वैभव इक्कर व त्याचा साथीदार चेतन चोरघे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी वैभव इक्कर आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आणि ज्या हॉटेलची तोडफोड केली होती. त्याठिकाणी त्याला आणून त्याची चांगलीच धुलाई केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत कोल्हेवाडी येथे सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करून कामगारांना मारहाण करत पैसे लुटल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धक्कादायक म्हणजे याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी आलेले हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनाही या गुन्हेगाराने मारहाण केली आहे. सराईत गुन्हेगार वैभव इक्कर व त्याचा एक साथीदार इंद्रप्रस्थ हॉटेल मध्ये गेले असता तेथील कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी अगोदर हुज्जत घालून दारुच्या बाटल्या फोडल्या. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी वैभव इक्कर याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांना मारहाण केली. त्यावेळी पोलीस तेथून निघून गेले. काही वेळानंतर त्या सराईत गुन्हेगाराने हॉटेलमधील कामगारांना मारहाण करत फ्रीज, काचेचे दरवाजे, दारुच्या बाटल्या यांसह इतर वस्तूंची तोडफोड करत सुमारे एक ते दिड लाखाचे नुकसान करुन गल्ल्यातील पंचवीस ते तीस हजार रुपये काढून घेतले. ही सर्व घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

तीन वेळा पोलिसांना मारहाण... 
 
वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराने आत्तापर्यंत तीन वेळा हवेली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे. तसेच पोलीसांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत त्याने अनेक वेळा कोल्हेवाडी परिसरात गोंधळ घातलेला आहे. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचे तब्बल तीन गुन्हे दाखल असून इतरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Where there is terror, there is punishment...! Vandalism criminal removed from Bhar Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.