"मासा छोटा असो किंवा बडा अडकला तो अडकला"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:27 PM2019-09-25T13:27:36+5:302019-09-25T13:27:41+5:30
राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोठ्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे: राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोठ्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ही सर्व प्रक्रिया आघाडी सरकारच्या काळातच झाली असून आता मासा छोटा असो किंवा बडा अडकला तो अडकला अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रावसाहेब दानवे म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात ज्यांनी कारखाने डबघाईला आणले त्यांनीच ते परत विकत घेतले. त्यामुळे आमच्या काळात नाही, तर काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी या बँकेवर प्रशासक मंडळ नेमले होते. आता आमच्या सरकारच्या काळात बँक नफ्यात आली आहे.त्यानंतर काही समाजसेवी संघटना कोर्टात गेल्या, आणि कोर्टाने निर्णय दिला की भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बँक आम्ही बरखास्त केली नाही किंवा गुन्हे आम्ही दाखल केले म्हणणे चुकीचे आहे. आम्ही फक्त उच्च निर्णयाची अंमलबजावणी केली.
तसेच 'आज राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक समोर ठेवून ही कारवाई केली असे म्हणत असली तरी त्यांच्याच काळात सुरू झालेली चौकशी टप्प्याटप्प्याने पुढे गेली व आता गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी काही केलंच नसेल तर घाबरायचं कारण नाही असा टोला लागवून मोकळ्या मनाने चौकशीला सामोरे जावे असा सल्लाही दिला.
युतीचा निर्णय पितृपक्ष संपल्यावर
भाजप व शिवसेनेची युती निश्चित असून अधिकृत निर्णय पितृपक्ष संपल्यावर जाहीर होईल असे सांगून त्यांनी अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले.