पशूबळी बंदीचा कायदा सरकार करणार की नाही; डॉ. कल्याण गंगवाल यांचा सवाल
By राजू इनामदार | Published: October 18, 2023 04:47 PM2023-10-18T16:47:36+5:302023-10-18T16:50:12+5:30
राज्यभरातील विविध गावांतील छोट्या-मोठ्या देवस्थानामध्ये दिले जाणारे हे बळी रोखण्यासाठी सरकारने कायदाच करणे गरजेचे
पुणे: देवीसमोर पशूबळी देणे ही अंधश्रद्धा आहे. त्यामुळे अनारोग्य अस्वच्छता व दुर्घटना इतके प्रकार होतात. काही देवस्थाने स्वयंस्फुर्तीने् पशूबळी बंद करण्याचा निर्णय घेत आहेत हे स्वागतार्हच आहे, मात्र सरकारने पशूबंळी बंदीचा थेट कायदाच करावा अशी मागणी सर्व मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. देवीभक्तांनाही अशा प्रथांपासून दूर रहावे असे आवाहन त्यांनी केले.
नवरात्र महोत्सवात पशुबळी न देण्याचा निर्णय नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानने घेतला त्याची माहिती डॉ. गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारचे निर्णय सर्वत्र व्हावेत यासाठी प्रतिष्ठान मागील २१ वर्षंपासून प्रयत्न करत आहे. देवाची आणि नवस पूर्ण करण्याची भीती नागरिकांच्या मनात असल्याने कर्ज काढून अशा प्रथा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची पिळवणूक होते. राज्यभरातील विविध गावांतील छोट्या-मोठ्या देवस्थानामध्ये दिले जाणारे हे बळी रोखण्यासाठी सरकारने कायदाच करणे गरजेचे आहे असे मत डॉ. गंगवाल यांनी व्यक्त केले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्यमंत्री तसेच याविषयाशी संबधित पोलिस तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांना याबाबत प्रतिष्ठानने पाठवले आहे असे त्यांनी सांगितले.
तुळजापूरात अजूनही अशी प्रथा पाळली जाते. तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. तुळजाभवानी मातेला आई म्हटले जाते. कोणतीही आई आपल्याला जीवंत जीवाचा बळी देणारा नैवैद्य द्या असे म्हणणार नाही. त्यामुळे आईभक्तांनी या प्रथेला विरोध करावा, येत्या खंडेनवमीला प्रतिष्ठानच्या वतीने तुळजापूर परिसरात याबाबत जागृती व आवाहन करणारी पत्रके वाटण्यात येणार आहे असे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.