दगड डोक्यावर ठेवला की छातीवर, मला सांगता येणार नाही : पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 08:08 AM2022-07-24T08:08:40+5:302022-07-24T08:09:34+5:30
एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाल्यानंतरही त्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था न देण्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात होता
पुणे : आम्ही मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिलं, असे चंद्रकांत पाटील म्हणत असतील; पण त्यांनी दगड डोक्यावर ठेवला की छातीवर, हे मला सांगता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाटील यांची खिल्ली उडवली.
एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाल्यानंतरही त्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था न देण्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात होता, यासंबंधी पवार म्हणाले की, मंत्री किंवा वरिष्ठांना सुरक्षा सुविधा पुरवण्यासंबंधी निर्णयासाठी मुख्य सचिव, गृहसचिव यांची समिती असते, हे मला माहिती आहे. समितीत चर्चा होते व त्यानंतरच निर्णय होतो. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व माझी सकाळीच भेट झाली. शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात हलगर्जीपणा झालेला नाही, त्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कधीही हस्तक्षेप केलेला नाही, असे त्यांनी सांगितल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.