कर्वे रस्त्यावर दुतर्फा पार्किंगचा निर्णय होणार की नाही; व्यापारी आक्रमक, वाहतूक शाखेचा नकार
By राजू इनामदार | Published: June 12, 2023 03:35 PM2023-06-12T15:35:06+5:302023-06-12T15:35:21+5:30
महाराष्ट्र नविनिर्माण सेनेनेही यासंदर्भात वाहतूक उपायुक्त कार्यालयाला निवेदन दिले आहे
पुणे: मेट्रोचे काम सुरू झाले म्हणून खंडूजी बाबा चौकापासून ते थेट करिष्मा चौकापर्यंत बंद करण्यात आलेले कर्वे रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहन लावण्याची मनाई उठवण्यात येणार आहे की नाही असा प्रश्न कर्वे रस्ता व्यापारी संघटनेच्या वतीने वाहतूक शाखेस करण्यात आला आहे. महाराष्ट्र नविनिर्माण सेनेनेही यासंदर्भात वाहतूक उपायुक्त कार्यालयाला निवेदन दिले आहे.
याआधी कर्वे रस्त्यावर सम विषम तारखांना दुचाकींसाठी वाहनतळ होता. मात्र चार वर्षांपूर्वी मेट्रोचे काम सुरू झाले. त्यावेळी खंडूजी बाबा चौकापासून ते थेट करिष्मा चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी चारचाकी वाहने लावण्यासाठी मनाई करण्यात आली. या रस्त्यावर दोन्ही बाजूंना बरेच व्यावसायिक आहेत. त्या सर्वांची या नियमामुळे अडचण झाली. त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला.
आता ४ वर्षांनंतर या रस्त्यावरचे मेट्रोचे सर्व काम झाले आहे. इतक कोणाचेही कसलेही काम सुरू नाही. दुहेरी उड्डाणपूल केल्यामुळे रस्त्यावरची वाहनांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे दुतर्फा वाहनतळ पुन्हा सुरू करावा अशी मागणी महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे हेमंत संभूस व व्यापारी संघटनेचे सचिव अजित सांगळे यांनी केली.
वाहतूक शाखेने त्यावर रसशाळा चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाताना व स्वातंत्र्य चौकाकडून रसशाळेकडे येतानाच्या मार्गावर एकूण ८ जागा सुचवल्या आहेत. त्याशिवाय चार चाकी वाहनांच्या पार्किंगसाठी एकूण ४ जागा सुचवल्या आहेत.कर्वे रस्ता व्हीआयपी रस्ता आहे. त्यावरून महत्वाच्या व्यक्तींची येजा होत असते. पार्किंगसाठी जागा दिल्यास अडचण येण्याची शक्यता आहे असेही त्या अहवालात नमुद केले आहे. त्यामुळेच कर्वे रस्ता व्यापारी संघटनाकडून संताप व्यक्त होतो आहे.