धर्मनिरपेक्ष आहात का, विचारणे गंभीर
By admin | Published: April 25, 2017 04:16 AM2017-04-25T04:16:31+5:302017-04-25T04:16:31+5:30
राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराशी संबंधित गोष्ट नाही. ती प्रत्येक नागरिकांशी निगडित गोष्ट आहे. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे.
पुणे : राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराशी संबंधित गोष्ट नाही. ती प्रत्येक नागरिकांशी निगडित गोष्ट आहे. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशात तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात का? तुम्ही राष्ट्रवादी आहात का? असे प्रश्न विचारले जाणे हे गंभीर आहे. राष्ट्रीय प्रश्नांची हाताळणी करण्याची पद्धत चुकते आहे का? असा सवाल माजी गृहसचिव माधव गोडबोले यांनी उपस्थित केला.
चिनार पब्लिशर्स तसेच सरहदच्या वतीने ‘कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय’ या माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या प्रशांत तळणीकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेद प्रकाश मलिक, सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते. उद्योजक अभय फिरोदिया अध्यक्षस्थानी होते.
गोडबोले म्हणाले, ‘‘भारत ज्या प्रकारे काश्मीरप्रश्न हाताळत आहे, ते पाहून काळजी वाटते. काश्मीरमधील जनता आणि सरकारमध्ये थेट संवादाची गरज आहे. संसदेत काश्मीरमधील जनतेच्या म्हणण्यावर चर्चा होत नाही. इंटरलोक्युटर्सना मंत्र्यांना भेटण्यातही अडचणी येतात. लोकशाही देशात त्यांना म्हणणे मांडण्याची संधी मिळत नाही. तेथील सामान्यांचे म्हणणे सरकारलाच ऐकून घ्यावे लागेल.’’
मलिक म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सुरक्षेला गृहीत धरले जाता कामा नये. आजूबाजूला खूप गोष्टी घडत आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने तयार असले पाहिजे. संरक्षणक्षेत्राचे बजेट दिवसेंदिवस वाढत आहे. या बजेटची तपासणी कॅग कडून केली जाते. ही तपासणी होण्याबरोबर संरक्षणक्षेत्रातील आपल्या क्षमतेचेही ‘आॅडिट’ झाले पाहिजे. कारगिल युद्धाने देशाला चांगले आणि वाईट धडे दिले. मात्र, त्यानंतरही लष्कर तितकेसे सुसज्ज झालेले नाही. आजकाल ‘हायब्रिड वॉर’ची भीती वाढली आहे. वेगळया प्रकारची युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत लष्कराप्रमाणेच सामान्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. दोन देशांमध्ये सामंजस्य करार होतात; मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे लष्करातील त्रुटी दूर होण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत.’’
फिरोदिया म्हणाले, ‘‘पाकिस्तानची लोकशाही फसवी आहे. तो दहशतवादाला प्रोत्साहन देणारा, लष्करातर्फे चालवला जाणारा देश आहे. पाकिस्तान भारतात कधीच शांतता नांदू देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला भारताची भीती नव्हे, तर धाक वाटला पाहिजे. त्यासाठी भारताची आर्थिक, सामाजिक आणि सैैन्यसामर्थ्य वाढले पाहिजे.’’
जाहिद भट यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)