कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन कोणती लस प्रभावी? मोदींच्या लसीकरणानंतर कोव्हॅक्सिनच्या मागणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:19 PM2021-03-03T13:19:50+5:302021-03-03T14:29:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन तर शरद पवारांनी कोविशिल्ड लस घेतली यावरुन सोशल मीडियावर दिवसभर तर्क-वितर्क लढवले जात आहे.
पुणे : पंतप्रधानांनीच घेतलेली लस आम्हाला द्या अशी थेट मागणी नागरिकांकडून होताना दिसते. मोदींच्या लसीकरणानंतर जिल्हा रुग्णालयात कोव्हॅक्सिन मिळत असल्याने तिथे येणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. यात खासगी रुग्णालयातील कोविशिल्ड लस नाकारून कोव्हॅक्सिन घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी करताना दिसत आहे. गमतीचा भाग म्हणजे सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
सोमवारी ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली, तर शरद पवारांनीही कोविशिल्ड लस घेतली की कोव्हॅक्सिन यावरुन सोशल मीडियावर दिवसभर तर्क-वितर्क लढवले जात होते. सोमवारी सामान्य नागरिकांनीही कोव्हॅक्सिनबाबत विचारणा केली. दोन्ही लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता मानवी चाचण्यांमध्ये सिध्द झाल्याने संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या भारतात सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. कोविशिल्ड लस महापालिका रुग्णालयांमध्ये तर कोव्हॅक्सिन लस जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे. मोदींनी कोव्हॅक्सिन लस घेतल्याने सोमवारी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका रुग्णालयांमध्येही त्याच लसीची मागणी केल्याचे समजते. सध्या कोविशिल्ड लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. दोन्ही लसी तितक्याच सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
सिंबायोसिस युनिर्व्हसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय नटराजन म्हणाले, ‘दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली आहे आणि मानवी चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शंका बाळगण्याचे कारण नाही. मात्र, कोणती लस जास्त चांगली, लाभदायक किंवा परिणामकारक अशा स्वरुपाचा अभ्यास अद्याप झालेला नाही. लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात वेग आल्यानंतर असा अभ्यास होऊ शकतो.’
मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख म्हणाले, ‘भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनबाबत जास्त प्रमाणात विचारणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही लसीमध्ये सुरक्षितता, परिणामकारकता आणि अर्थकारण हे मुद्दे महत्वाचे असतात. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. देशात दीड कोटीहून अधिक लसीकरण झाले आहे. कोणत्याच लसीचे वाईट परिणाम लक्षणीयरित्या समोर आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संभ्रम न बाळगता राष्ट्रीय कर्तव्य समजून लसीकरणासाठी पुढे यावे.’