बांधकाम परवाने मंजुरीसाठी लाच घेताना पालिकेच्या एजंटला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 11:21 PM2018-12-04T23:21:30+5:302018-12-04T23:21:37+5:30
पुणे : बांधकाम परवानगी व नकाशे मंजूर करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक ...
पुणे : बांधकाम परवानगी व नकाशे मंजूर करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून पकडले. सुवेद शिवराम दुडये (वय ३२, रा. गंगाधाम, गोकुळनगर, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. बिबवेवाडीतील ढेरे असोसिएटस येथे तो कामाला आहे.
याबाबतची माहिती अशी, महापालिकेचे अधिकारी बांधकाम परवानग्या व नकाशे मंजूर करण्यासाठी स्वत: लाच न स्वीकारताना एजंटामार्फत पैसे घेत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. तक्रारदार यांचे कोंढव्यातील टिळेकरनगर येथील जागेवर बांधकाम परवानगी व नकाशा मंजूर करण्यासाठी त्यांनी ढेरे असोशिएसमध्ये नोकरी असणारे सुवेद दुडये यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.
दुडये यांनी मंजुरीसाठी महापालिका अधिकाऱ्यांना ३० हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, असे सांगितले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी केल्यावर दुडये हे महापालिका अधिकाऱ्यांसाठीच लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी ढेरे असोसिएटस येथे उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, कांचन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना दुडये याला पकडण्यात आले.