ड्रेनेज स्वच्छ करतांना स्वच्छता कर्मचारी पडले बेशुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:18+5:302020-12-27T04:09:18+5:30
विषारी वायूचा परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : बारामती नगर परिषदेचे कर्मचारी हे गुरुवारी हनुमान नगर येथील पवार वस्तीवर ...
विषारी वायूचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती नगर परिषदेचे कर्मचारी हे गुरुवारी हनुमान नगर येथील पवार वस्तीवर ड्रेनेज साफ करण्यासाठी गेले असता विषारी वायुमुळे दोन कर्मचारी बेशुद्ध पडले. येथील निलेश अहिवळे यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून स्वत:चा जीव धोक्यात घालून दोघांचे प्राण वाचवले. ही घटना गुरूवारी (दि २४) घडली.
माळेगाव रस्त्यावरील पवार वस्ती येथील ड्रेनेज तुंबले होते. हे ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी आरोग्यनिरीक्षक अजय लालबीगे, सक्षन मशीनवरील चालक निलेश अहिवळे, स्वच्छता कर्मचारी गोपाल वाल्मिकी, राजु वाल्मिकी, हमीद शेख, अक्षय अवघडे, फिरोज शेख यांनी बारा फूट खोल असणाऱ्या चेंबरमध्ये हमीद शेख हा कर्मचारी उतरला. चेंबरमध्ये तयार झालेल्या विषारी वायू मुळे तो बेशुद्ध पडला. त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या अक्षय याला देखील चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. गोंधळ ऐकून अहिवळे हे वेळ न घालवता चेंबरमध्ये उतरले व अक्षय याला बाहेर काढले. मात्र अक्षय याच्या तोंडातून रक्त येत होते तर अहिवळे यांनी खाली बेशुद्ध असलेल्या हमीदचे तोंड गटाराच्या पाण्यातून वरती धरून त्याला धरून ठेवले होते. मात्र पाण्यातील वायू मुळे आता अहिवळे हे सुद्धा चेंबर मध्ये बेशुद्ध पडले. हा सगळा प्रसंग घडत असताना वरती असणारे सगळे कर्मचारी गोंधळून गेले होते. फिरोज या कर्मचाऱ्याने दोरीच्या साहाय्याने खाली उतरत इतर कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने अहिवळे व हमीद या दोघांना चेंबर मधून बाहेर काढले. मात्र हे सगळे बेशुद्धावस्थेत असल्याने सर्व कर्मचारी घाबरले. त्यांनी तिघांची छाती दाबून व त्यांना हवा घालून शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होते. या कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट आहे हे लक्षत आल्यावर गटनेते सचिन सातव यांना घटना सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या खाजगी वाहनाने शासकीय रुगणल्यात दाखल केले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून रूग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले. शनिवारी (दि.२७) या सफाई कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, हमीद शेख या सफाई कर्मचाऱ्याला घरी आल्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागला. त्यांना पुन्हा खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.
चौकट
बारामती नगर परिषद ही ''''अ'''' वर्ग नगर परिषद आहे. परंतू स्वच्छता कर्मचारी यांना ड्रेनेज साफ करण्यासाठी जेव्हा खाली उतरावे लागते. त्यासाठी असणारे दोरशिडी, हेल्मेट, आॅक्सिजन टँक, मास्क गरजेचे आहे. मात्र, पालिकेकडे यापैकी कोणतेही साधने उपलब्ध नाहीत. याबाबत अनेक वेळा मागणी करून देखील ही साधने मिळत नाहीत. भूमीगत गटारींचे चेंबर बंद असते त्यामुळे विषारी वायू तयार होतात. चेंबर मधील खराब पाणी काढण्यासाठी जेटींग मशीन असणे गरजेचे आहे. आम्ही प्रसंगावधान दाखवले नसते तर आमच्या पैकी एखाद्याच्या जीवावर बेतले असते. आम्ही तिघे मृत्यूच्या दारातून परत आलो आहे.
- निलेश अहिवळे, वाहन चालक, बारामती नगरपरिषद
कोट
नगर पालिकेने चेंबरसाठी लागणारी जेटिंग मशीन घेणार आहे. विभाग प्रमुखांनी त्यांना लागणाऱ्या साहित्याच्या बाबतीत आम्हाला सांगणे गरजेचे आहे. तशा सूचना विभाग प्रमुखना दिल्या असून लवकर लागणारे साहित्य मागावणार आहे.
- पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बारामती नगरपरिषद
---------------------------------