उमेदवारी साठी कागदपत्र गोळा करतानाच होते दमछाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:19+5:302020-12-26T04:09:19+5:30
--- कान्हुरमेसाई : जिल्ह्यातील ७४९ ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नाम निर्देशन पत्र सोबत जोडव्या लागणाऱ्या कागदपत्रावरून उमेदवाराचा ...
---
कान्हुरमेसाई : जिल्ह्यातील ७४९ ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नाम निर्देशन पत्र सोबत जोडव्या लागणाऱ्या कागदपत्रावरून उमेदवाराचा प्रचंड गोंधळ होत आहे. शपथपत्र, हमीपत्र, स्वयंघोषणा पत्रासाठी साधा कागद की मुद्रांक वापरावा यावरूनही उमेदवारांमध्ये संभ्रम असल्याने त्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आता सर्वत्र निर्माण झाले आहे.
निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांसाठी माहितीपत्रक लावण्यात आले त्यामध्ये नाम निर्देशन पत्र सोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी आहे त्या यादीत उल्लेख करताना शपथपत्र, स्वयंघोषणापत्र, हमीपत्र असे उल्लेख आहेत. त्यापैकी कोणता पुरावा साध्या कागदावर द्यावा किंवा मुद्रांकावर हवा याबाबत कुठेही स्पष्ट केलेले नाही त्यामुळे काही उमेदवार सरसकट शंभर रुपयांच्या मुद्रांकावर ते सर्व सादर करीत आहेत तर काही उमेदवार साध्या कागदावरच देत आहेत त्यामुळे या दोन्ही पद्धतीत कोण चूक किंवा कोण बरोबर हे स्पष्ट होत नाही त्यातच छाननीमध्ये कोणाचा अर्ज बाद ठरेल ही त्यामुळे स्पष्ट होऊ शकत नाही त्यातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कडून याबाबत स्पष्टता होत नसल्याने गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
नाम निर्देशन पत्र सोबत लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र , दोन पेक्षा अधिक अपत्ये नसल्याचे प्रमाणपत्र, विवाहित महिलेला माहेरचे आणि सासरचे या नावाची एकच व्यक्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र, कोणताही गुन्हा दाखल किंवा शिक्षा झाली नसल्याचे शपथपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत उपलब्ध करून देणार असल्याचे हमी पत्र , नावे असलेली संपत्ती मालमत्तेचे घोषणापत्र या कागदा पत्राचा समावेश आहे. त्यातच राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवारांना समितीपुढे सादर करण्यासाठी वंशावळीचे प्रतिज्ञापत्र दावा केलेल्या जातीचे पुरावे जोडत असल्याचे शपथपत्र ही द्यावे लागते शौचालय प्रमाणपत्र ग्रामपंचायतीच्या ठरवासह जोडायचे आहे की हे सर्व कागदपत्र देताना नेमकी कोणत्या मुद्रांकावर व कोणत्या साध्या कागदावर याबाबत उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होत आहेत. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र केवळ शंभर रुपयांच्या मुद्रांकावर द्यावे लागते असे सांगण्यात आले आहे.
--
चौकट
सातवी उत्तीर्णतेचीही अट
--
५ मार्च 2020 रोजीच्या अधिनियमानुसार जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीला निवडणूक लढण्यासाठी सातवी उत्तीर्णतेची आठ आहे त्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्ती आता सातवी उत्तीर्ण नसेल तर तिला निवडणूक लढता येणार नाही. हे विशेष. उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी सुट्टीच्या दिवशीही जात वैधता अर्ज स्वीकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २६ आणि २७ डिसेंबर रोजी सुट्ट्या आहेत त्या दिवशीही जात वैधता प्रमाणपत्र ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहेत.
--
शिरुर तालुक्यातील गुरुवारपर्यंत ३८ उमेदवारी अर्ज दाखल
--
जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी शिरूर तालुक्यात ३८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्यादिवशी २४ डिसेंबर रोजी शिरूर तालुक्यात ३८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. असल्याचे शिरूरचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.