जोशीमठची चर्चा देशभर असताना पुणे जिल्ह्यातील २३ गावे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:42 PM2023-01-19T13:42:44+5:302023-01-19T13:46:22+5:30

जोशीमठ शहराजवळ खोदलेल्या बोगद्यामुळे भूगर्भातील जमीन हादरली गेली व त्याचा परिणाम शहरावर झाला...

While Joshimath is being talked about all over the country, 23 villages of Pune district are on the way to make history | जोशीमठची चर्चा देशभर असताना पुणे जिल्ह्यातील २३ गावे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर

जोशीमठची चर्चा देशभर असताना पुणे जिल्ह्यातील २३ गावे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर

googlenewsNext

- नीलेश काण्णव

भीमाशंकर (पुणे) : देशभर सध्या जोशीमठ शहराचे पुनर्वसन करण्याची चर्चा सुरू असताना माळीण दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडू शकतात. येथे लवकर योग्य त्या उपाययोजना करा, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी कळवूनही जिल्हा यंत्रणेकडून कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

जोशीमठ शहराजवळ खोदलेल्या बोगद्यामुळे भूगर्भातील जमीन हादरली गेली व त्याचा परिणाम शहरावर झाला. असाच काहिसा प्रकार पश्चिम घाटातील सह्याद्रीमध्ये आहे. या डोंगर रांगांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या विकासकामांमुळे बोगदे खोदले गेले आहेत, डोंगर तोडले आहेत, झाडे कमी झाली आहेत. सहयाद्रीमधील नद्या प्रदूषित झाल्या आहेत, पुणेसारख्या शहराची हवा दूषित झाली आहे.

याचा परिणाम सह्याद्रीमधील गावांवर होऊ लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या छोट्या- मोठ्या घटना घडत असतात. माळीण दुर्घटना याचे एक उदाहरण आहे. असे प्रकार भविष्यात घडत रहाणार आहेत. निसर्गाचे झालेले नुकसान एवढ्या लवकर भरून येणारे नाही. यासाठी धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण होऊन येथे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी भेटीप्रसंगी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी माळीणसारख्या दुर्घटना इतर गावांमध्ये घडू नयेत, यासाठी संपूर्ण राज्यातील डोंगरांमधील वसलेल्या गावांचे सर्वेक्षण करा, असे प्रशासनाला सांगितले होते. त्यावरून पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण केले होते.

त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये भूस्खलन होण्याच्या दृष्टिने धोकादायक असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी जिल्हाधिकऱ्यांना कळविले आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील फुलवडे अंतर्गत भागितवाडी, माळीण अंतर्गत पसारवाडी, आसाणे, जांभोरीअंतर्गत काळवाडी क्रं. १ व २, पोखरीअंतर्गत बेंढारवाडी या पाच गावांचा समावेश होता.

तसेच भोर तालुक्यातील धानवली, कोर्ले जांभवली, डेहणे, पांगरी सोनारवाडी, जुन्नर तालुक्यातील निमगिरीअंतर्गत तळमाचीवाडी, खेड तालुक्यातील भोमाळे, भोरगिरी अंतर्गत पदरवस्ती, मावळ तालुक्यातील माऊ मोरमाचीवाडी व गभालेवस्ती, सावळे कडकराई, लोहगड, मालेवाडी, ताजे, बोरज, तुंग श्री भैरवनाथ मंदिर परिसर, भुशी, मूळशी तालुक्यातील घुटके, वेल्हा तालुक्यातील आंबवणे व घोल या गावांचा समावेश आहे.

या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. यामध्ये गावांतील धोकादायक ठिकाणे, लोकसंख्या विषयी माहिती, निवारा, स्थानिक सामाजिक संस्था, आपत्ती दरम्यान संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचे संपर्क नंबर, हॉटेल, शेती विषयक माहिती, आपत्तीचा इतिहास, आपत्ती प्रवण भाग दर्शविणारा नकाशा, हॉस्पिटल, उपलब्ध असलेले साहित्य या गोष्टींचा अराखड्यात समावेश असावा. तसेच तालुका प्रशासनाने या गावांवर विशेष लक्ष ठेवावे असे सांगितले आहे.

या यागावांमध्ये योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे, अथवा गरज पडल्यास या गावांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. या २३ गावांपैकी आंबेगाव तालुक्यातील पाच गावांचे पुनर्वसन करण्याच्या हलचाली सुरू आहेत. बाकी ठिकाणी फारशी कारवाई होताना दिसत नाही.

Web Title: While Joshimath is being talked about all over the country, 23 villages of Pune district are on the way to make history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.