लाच घेताना सरपंचासह दोघांना रंगेहाथ पकडले
By admin | Published: October 7, 2015 04:08 AM2015-10-07T04:08:13+5:302015-10-07T04:08:13+5:30
रस्त्याच्या कामाचे थकीत बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून २७ हजार ५०० रुपयांची लाच घेताना कालठण नं. १ (ता. इंदापूर) येथील महिला सरपंचाचा मुलगा व ग्रामसेवकाला
इंदापूर : रस्त्याच्या कामाचे थकीत बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून २७ हजार ५०० रुपयांची लाच घेताना कालठण नं. १ (ता. इंदापूर) येथील महिला सरपंचाचा मुलगा व ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी रंगेहाथ पकडले. त्या दोघांसह लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याबद्दल महिला सरपंचावरदेखील कारवाई करण्यात आली आहे.
सरपंच सुरेखा सुधाकर चव्हाण (वय ५५, रा. कालठण नं. १), तिचा मुलगा अमित सुधाकर चव्हाण (वय ३०), ग्रामसेवक पवनकुमार सुभाषचंद्र भालेराव (वय ४९, रा. सोनाईनगर, इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सविस्तर हकिगत अशी, की लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या ठेकेदाराने कालठण नं. १ मधील रस्त्याचे काम केले होते. त्या कामाचे पाच लाख रुपयांचे बिल थकीत होते. ते काढून देण्यासाठी महिला सरपंच सुरेखा चव्हाण हिने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ग्रामसेवक पवनकुमार भालेराव याने अडीच हजार रुपये मागितले होते. या ठेकेदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि. ६) सकाळपासूनच सापळा रचला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाचा मुलगा अमित चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर गलांडवाडी नं. १ गावाच्या हद्दीतील सोनाज पेट्रोल पंपाजवळच्या हॉटेल सौरभमध्ये अडीच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक पवनकुमार भालेराव याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाच स्वीकारण्यास संमती दिल्याच्या आरोपावरून सरपंच सुरेखा चव्हाण हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.