लाच घेताना तलाठ्याला पकडले
By admin | Published: August 28, 2014 04:08 AM2014-08-28T04:08:30+5:302014-08-28T04:08:30+5:30
बिगरशेती म्हणून मंजूर झालेल्या जमिनीची सातबाराच्या उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले
इंदापूर : बिगरशेती म्हणून मंजूर झालेल्या जमिनीची सातबाराच्या उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना तालुक्यातील लोणी-देवकर (ता. इंदापूर) गावच्या तलाठ्याला आज (दि. २७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याच्याच कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
संपत श्रीरंग गायकवाड (रा. डाळज नं. ३, ता. इंदापूर) असे तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की तक्रारदाराची लोणी-देवकर गावच्या हद्दीत गट क्र. ७ मध्ये जमीन आहे. तिचा काही भाग बिगरशेतीसाठी मंजूर झाला आहे. त्याची नोंद सातबाराच्या उताऱ्यावर लावण्यासाठी तक्रारदार लोणी-देवकर गावच्या तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत होता. नोंद लावण्यासाठी गायकवाड याने पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर १३ हजार रुपयांत तडजोड झाली. ती रक्कम आज द्यायचे ठरले होते.
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेशी संपर्क साधून तक्रार दिली. तक्रारीनुसार आज सकाळपासूनच दोन उपअधीक्षक, ४ पोलीस कर्मचारी, एक महिला पोलीस कर्मचारी आदींनी लोणी-देवकर तलाठी कार्यालयाभोवती सापळा रचला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराने गायकवाड याच्या टेबलावर १३ हजार रुपयांची रक्कम ठेवताक्षणी अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)