चाकणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून ८५ हजारांची लाच घेताना एकाला रंगेहाथ पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 04:07 PM2021-12-30T16:07:47+5:302021-12-30T18:27:42+5:30
आरोपीने उपनिरीक्षक यांच्यासाठी ७० हजार तर स्वत:साठी १५ हजार रुपये, असे एकूण ८५ हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली.
चाकण : पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी ८५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेचाकण पोलीस ठाणे येथे बुधवारी (दि. २९) ही कारवाई केली. चाकण पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकाचाही याप्रकरणात समावेश असून त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अखत्तर शेखावत अली शेख (वय ३५), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रार तरुणाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. त्यावरून कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ७० हजारांची लाच मागितली. त्यानुसार आरोपी शेख याने उपनिरीक्षक यांच्यासाठी ७० हजार तर स्वत:साठी १५ हजार रुपये, असे एकूण ८५ हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली.
दरम्यान, तरुणाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून आरोपी शेख याला ८५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक क्रांती पवार तपास करीत आहेत.