‘पेलें’चा निरोप घेताना...कोल्हापुरी फुटबॉलचा इतिहास लिहिताना
By admin | Published: February 28, 2017 01:17 AM2017-02-28T01:17:35+5:302017-02-28T01:18:23+5:30
लोकमतच्या क्रीडा विभागाचे अभिनंदन ! मानाचा मुजरा !
कोल्हापूर प्रिमीयर लीग (केपीएल)च्या माध्यमातून ‘लोकमत’ने या खेळाला पेठ आणि तालमीच्या पठडीतून बाहेर काढून व्यावसायिक रुप दिले. फ्रँच्याईजी शोधून बोलीद्वारे खेळाडूंवर पैशाची बरसात केली. खेळ, खेळाडूसोबतच त्याच्याशी निगडीत सर्वच घटकांचा विकास साधणारी एक ऐतिहासिक स्पर्धा म्हणून लोक अजूनही केपीएलची आठवण काढतात. कोल्हापुरी फुटबॉलचा इतिहास लिहिताना त्यात केपीएलचा अध्याय मानानं लिहला जाईल.
डॉ. अभिजित वणिरे यांच्या लेखमालेमुळे आज जुन्या खेळाडूंची आठवण संपूर्ण शहराला माहिती झाली. जुन्या खेळाडूंची लोकप्रियाता लोकांच्यार्पंत पोहचविण्याची किमया केली ती फक्त आणि फक्त लोमत या दैनिकानेच. लोकमतच्या क्रीडा विभागाचे अभिनंदन ! मानाचा मुजरा !
काल्हापूरची आण-बाण-आणि शान असलेल्या कोल्हापुरी फुटबाल खेळाला शतकी परंपरा लाभली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनेक खेळाडूंनी ही संस्थानकालीन परंपरा जगवली, टिकवली आणि वाढविली. या परंपरेचे पाईक असलेल्या शंभरभर रत्नांची ओळख आपण ‘कोल्हापूरचे पेले’ या सदरातून गेले काही दिवस करून घेतली. कोल्हापुरी फुटबॉलमधील तिसऱ्या पिढीचा जीवन आलेख मांडणाऱ्या या मालिकेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यातील काहीजण अजूनही फुटबॉल खेळाशी निगडित आहेत, तर काहीजण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या व्यापात गुंतले आहेत. असे असले तरी मैदानावर घालविलेल्या त्या सोनेरी दिवसांची आठवण प्रत्येकाच्याच हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेली. या बंद कप्प्यांची कवाडे उघडण्याचे काम या लेखमालेने केले. जुन्या मखमली आठवणींनी काहीजणांना पुन्हा तरुण केले. अनेक प्रसंग, बऱ्या-वाईट घटनांचा फ्लॅशबॅक नजरेसमोरून तराळून गेला.
या लेखमालेतील वर्णन केलेल्या दिग्गज फुटबॉलपटूंच्या काळात फुटबॉलपटूंना स्पर्धेतून कमाई मिळणे दूरच, प्रसंगी पदरमोड करावी लागे. शूज, जर्सी, इतर कीट यासाठी पैसे नसल्याने अनेकांना खेळता आले नाही. बाहेरगावच्या स्पर्धांना जाताना प्रसंगी पदरमोड करावी लागत असे. पण त्या काळात एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे काही व्यावसायिक संघ उदयास आले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुर्वे आणि शिवाजीराव पाटील या अधिकाऱ्यांनी महापालिकेचा फुटबॉल संघ तयार केला. यासाठी शहरातील निरनिराळ्या संघांतील चांगले खेळाडू शोधून त्यांना केएमसी संघात आणले. त्यांच्या रोजीरोटीची सोय व्हावी म्हणून त्यांना महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत नोकऱ्या दिल्या. फुटबॉलमुळे कमी शिक्षण असतानाही अनेकांच्या अर्थार्जनाचा प्रश्न सुटला. अशीच गोष्ट एस.टी.बाबत झाली. त्यांनीही उच्च दर्जाचा फुटबॉल संघ तयार केल्याने अनेक खेळाडू राज्य परिवहन खात्यात रुजू झाले. कोल्हापुरातील उद्योजक मेनन कंपनीनेही फुटबॉल संघ तयार करून खेळाडूंना नोकऱ्या दिल्या. या तीन संघांमुळे कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पहिल्यांदा व्यावसायिकपणा आला. खेळाडूंना चांगल्या सुविधा अन् खुराक मिळू लागला. शिवाय शहराबाहेर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. नोकरीमुळे कौटुंबिक घडी व्यवस्थित बसली. अनेक कुटुंबे सुखी झाली.
मात्र, काळाच्या ओघात हे संघ अस्तित्व गमावून बसले आणि कोल्हापूरचा फुटबॉल पुन्हा पारंपरिक पठडीत आला. कोल्हापूरला दर्जेदार, प्रतिभावान खेळाडूंची कधीच वानवा नव्हती, हे या लेखमालेतून आपण पाहिलेच आहे; पण या प्रतिभेला आणि दर्जाला योग्य व्यासपीठ मात्र मिळाले नाही. अगदी अलीकडील काही वर्षांचा अपवाद वगळता कोल्हापूरचा फुटबॉल पेठेच्या परिघापलीकडे गेलाच नाही.
खेळाविषयी इतकी जबरदस्त पॅशन असतानाही कोल्हापुरात फुटबॉलचा म्हणावा तितका विकास होऊ शकला नाही. शासनपातळीवर या खेळासाठी कोणतीही ठोस योजना आणण्यात कोल्हापूरची राजकीय इच्छाशक्ती कमी पडली. सुदैवाने या खेळासाठी शहराच्या मध्यभागी शाहू स्टेडीयम उपलब्ध आहे. या स्टेडीयमच्या विकासासाठी शासनाने भरीव निधी देऊन येथे वर्ल्डक्लास सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. येथे उत्कृष्ट लॉन, प्रशस्त ड्रेसिंग रूम, अत्याधुनिक जीम, प्रेक्षागृहात चांगली बैठक व्यवस्था, रात्रीच्यावेळी सामने व्हावेत म्हणून फ्लडलाईटची सोय, स्टेडीयमबाहेर प्रशस्त पार्किंग व्यवस्था या गोष्टी झाल्या तर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामनेसुद्धा होऊ शकतील.
सध्या स्टेडीयमची देखभाल आणि दुरुस्तीचे काम केएसए करीत आहे; पण त्यांना उत्पन्नाचे स्रोत तुटपुंजे आहेत. त्यामुळे त्यांना मर्यादा येतात.
शासनाच्या थेट मदतीशिवाय येथील फुटबॉलने अलीकडील काही वर्षांत कात टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: मालोजीराजे छत्रपती यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कोल्हापुरी फुटबॉलचे क्षितिज विस्तारले. मालोजीराजेंच्या पुढाकारामुळे पुणे, मुंबई, दिल्लीतील क्लबबरोबरच अमेरिका खंडातील, युरोपमधील, आखाती देशांतील क्लब कोल्हापूरकडे आशेने पाहू लागले. तेथील अनेक क्लबनी कोल्हापुरात टॅलेंट हन्ट कार्यक्रम राबवून अनेक कुमारवयीन प्रतिभावान मुलांना शोधले. अनिकेत जाधवचे याबाबतीत उदाहरण बोलके आहे. जर्मनीतील बायर्न म्युनिच संघाने घेतलेल्या शोधमोहिमेत सापडलेला हा हीरा क्लबकडून २३ देशांच्या क्लबविरुद्ध खेळला आहे. आता तो १७ वर्षांखालील संघातून विश्वचषक खेळण्यास सज्ज झाला आहे; पण परदेशातील क्लबच्या मेहेरबानीवर आपण किती दिवस अवलंबून राहायचे? या मातीतील गुणवत्ता इथेच नको का घडायला? त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पाच-दहा वर्षांतून एखादा अनिकेत शोधण्यापेक्षा घरोघरी अनिकेत तयार व्हावेत यादृष्टीने पावले उचलायला हवीत. त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची..., नेमकी तीच कमी पडत आहे..!
(समाप्त) --- विश्वास चरणकर
भरभरून प्रतिसाद !
सचिन भोसले -- कोल्हापूर
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कोल्हापूरचे पेले’ या लेखमालेला जनमाणसांत उदंड प्रतिसाद मिळाला. ज्यांचा लेख प्रसिद्ध झाला, ते स्वत: ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करीत होते. काही खेळाडूंना जाणणारे त्यांचे जुणे स्नेही, नातेवाईक, त्यांच्याबरोबर खेळणारे समकालीन खेळाडू हे सुद्धा या प्रसिद्धीबद्दल आभार व्यक्त करीत होते. अनेकांनी या लेखाला फ्रेम करून घरात फोेटो लावले आहेत.
या लेखमालेबद्दल आलेल्या या काही निवडक प्रतिक्रिया...!
संस्थानकालापासून सुरू असलेल्या फुटबॉलमध्ये अनेक फुटबॉलपटूंनी आपल्या कामगिरीने नावलौकिक केला. त्यांची खेळण्याची ‘खास शैली’ निर्माण केली. अशा अनेक खेळाडूंची विस्तृत माहिती ‘लोकमत’ने आपल्या ‘कोल्हापूरचे पेले’ या सदरातून मांडली ही बाब आजच्या खेळाडूंना प्रेरणादायी ठरणारी आहे.
- मधुरिमाराजे छत्रपती
(चेअरपर्सन, विफा, महिला फुटबॉल कमिटी )
काळाच्या ओघात जुन्या फुटबॉलपटूंचा विसर पडला होता. त्यात फुटबॉल या खेळामुळे अनेकांना नोकऱ्या लागल्या. प्रामाणिक आणि सातत्याने सराव केल्यानंतर खेळात कशी प्रगती होते याची जाण आमच्या विस्मृतीत गेलेल्या खेळाडूंच्या लेखामुळे नव्या खेळाडूंना झाली. विशेष म्हणजे अनेक युवा खेळाडूंनी भेटून ‘सर, तुमच्याबरोबर कोणते खेळाडू खेळले’ असे विचारून त्यांची माहितीही फोनद्वारे, स्वत: भेटून घेतली. विशेष म्हणजे आम्ही त्या काळी खेळलो ही बाब आमच्या नव्या पिढीलाही माहीत झाली.
- विश्वास कांबळे-मालेकर
(माजी खेळाडू प्रॅक्टिस क्लब, युनियन बँक )
आम्हाला त्या काळी आजच्यासारख्या सुविधा, प्रशिक्षक नव्हते. स्वत:च शैली निर्माण करायची आणि खेळ करायचे एवढेच माहिती होते. विशेष म्हणजे प्रामाणिक खेळ करणे आणि संघाचा विजय मिळविणे एवढेच ध्येय होते. ही बाब ‘लोकमत’मधून आलेल्या ‘कोल्हापूरचे पेले’ या सदरातून आजच्या पिढीतील फुटबॉलपटूंना कळाली. त्याकाळी खेळावर घेतलेल्या कष्टाचे चीज झाले.
- माणिक मंडलिक,
(महासचिव के. एस. ए.,
माजी फुटबॉलपटू प्रॅक्टिस क्लब)
खेळावर प्रेम केल्यानंतर त्याचे फळ चांगलेच मिळते. तो मग खेळ कोणताही असो. विशेषत: ‘कोल्हापूरचे पेले’ या सदरातून जुन्या फुटबॉलपटूंना कोणतीही सुविधा नसताना केवळ सरावातील सातत्यामुळे नोकरी, प्रसिद्धी मिळाली, खेळातील शैली नसताना ती निर्माण केली. अशा जुन्या-जाणत्या फुटबॉलपटूंची आजच्या पिढीतील फुटबॉलपटूंना नव्याने ओळख झाली. अनेकांचा खेळ कसा होता हे वाचून कळले. अशा प्रकारचे लेख कोल्हापूरच्या फुटबॉलला उभारी देणारे ठरत आहेत.
- सरदार मोमीन (अध्यक्ष, के. एस. ए.)
जुन्यांच्या खेळाचे हुबेहूब वर्णन ‘लोकमत’मधील लेखांतून आजच्या युवकांना वाचता आले. सुविधा नसतानाही अनेक खेळाडू घडले. अनेकांना त्याकाळी नोकरी मिळाली. हे केवळ फुटबॉलमधील सरावात सातत्य ठेवल्याने झाले. खेळावर प्रेम करणारी जुनी मंडळी होती. त्यातून आजच्या पिढीतील खेळाडूंनी आदर्श घेण्यासारखा आहे. खेळ आयुष्य घडवितो हेही लेखमालेतून सिद्ध झाले.
- संभाजी जाधव, (नगरसेवक,
माजी फुटबॉलपटू पीटीएम )
आम्ही प्रतिकूल परिस्थितीत खेळलो. आज खेळांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. चांगले प्रशिक्षक आज उपलब्ध आहेत. आमच्या काळातील खेळ केवळ ‘लोकमत’मधील लेखातून आजच्या युवा फुटबॉलपटूंपुढे आला. हा एकप्रकारे इतिहासच म्हणावा लागेल. आमच्या कुटुंबालादेखील ही बाब अत्यंत आनंददायी वाटली. लेखातील अनेक जुने खेळाडू कसे खेळले हेही जगासमोर आले. या सर्व बाबी युवा फुटबॉलपटूंनी अभ्यासण्यासारख्या आहेत.
- शाम देवणे
(पोलिस उपनिरीक्षक, माजी फुटबॉलपटू पाटाकडील तालीम मंडळ )
लेखमालेतून जुन्या खेळाडूंच्या स्मृतींना उजाळा मिळाला. विशेष म्हणजे हयात आहेत त्यांच्याशी संपर्क साधून बोलता आले. ही बाब केवळ ‘लोकमत’मुळे घडली. हे खेळाडू खेळून कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात एक सुवर्णपान कोरून गेले हेही या लेखांमुळे अनेकांना समजले. आजच्या पिढीतील खेळाडूंनी हा आदर्श घेण्यासारखा आहे. काही जुन्या खेळाडूंच्या अगदी तिसऱ्या पिढीतील नातवांनाही आपले आजोबा त्याकाळी ‘स्टार खेळाडू’ होते हेही या लेखमालेतून कळाले. ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद वाटली.
- विकास पाटील (शिवाजी तरुण मंडळ, माजी फुटबॉलपटू )
आमच्यासारख्या नवोदितांना त्याकाळच्या जुन्या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहता आला नाही. मात्र, ‘लोकमत’च्या ‘कोल्हापूरचे पेले’ या लेखमालेतून तो वाचून जणू खेळत पाहत असल्याचा फिल अनुभवला. त्यांच्या शैली व खेळातील कसब आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे.
- हृषिकेश मेथे-पाटील, (पाटाकडील तालीम मंडळ, फुटबॉलपटू)
ज्याकाळी कोणत्याही सुविधा नसताना फुटबॉलपटू कसे घडले, त्याची इत्यंभूत माहिती आजच्या पिढीला केवळ ‘लोकमत’मधील ‘कोल्हापूरचे पेले’ या सदरातून समजली. अनेक युवा खेळाडू आजचा लेख वाचला का, असे एकमेकांना विचारत आहेत. अनेकांना पूर्वी इतके चांगले खेळाडू फुटबॉलमध्ये घडले हे वाचून कळाले. विशेष म्हणजे फुटबॉल चांगला खेळला की नोकरी आणि करिअर करता येते, याची जाणीवही या लेखांमधून कळाली. ही बाब कोल्हापूरच्या फुटबॉलला उभारी देणारी आहे.
- प्रदीप साळोखे (फुटबॉल प्रशिक्षक)
सर्व सुविधा उपलब्ध असतानाही खेळाडू चमक दाखवू शकत नाहीत. अशा युवा फुटबॉलपटूंसाठी ‘कोल्हापूरचे पेले’ ही लेखमाला बुस्टर देणारी ठरली आहे. जुन्या खेळाडूंचा आदर्श घेऊन भावी पिढीने वाटचाल करावी.
- लाला गायकवाड (शिवाजी तरुण मंडळ, माजी फुटबॉलपटू)
सुरेश पाटील --- बाबूराव घाटगे -- प्रकाश राऊत