ओढ्यावर कपडे धुताना पातेले वाहून गेले; ते घेण्यासाठी आई गेल्यावर मुलगीही मागे गेली अन् अनर्थ घडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 01:15 PM2024-09-25T13:15:14+5:302024-09-25T13:15:41+5:30
चार वर्षांची मुलगी ४ दिवसांसाठी आईकडे आली होती अन् ती वाहून गेली, चिमुकलीने जीव गमावला
कात्रज : मंगळवारी दुपारच्या वेळेस जांभूळवाडी दरीपुलाजवळ कोळेवाडी महादेव मंदिराजवळ असणाऱ्या ओढ्यामध्ये एका चार (अंदाजे) वर्षांच्या मुलीचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. कात्रज अग्निशमन दलाकडून संध्याकाळी सहा वाजता सदर मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
माधुरी रघुनाथ रांजणे (अंदाजे वय ४ वर्षे, रा. कोळेवाडी), असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माधुरी ही तिच्या आईसोबत कोळेवाडी येथील महादेव मंदिराशेजारी असणाऱ्या ओढ्यावर गेली होती. आई कपडे धुत असताना कपडे धुण्यासाठी असलेले पातेले ओढ्यामध्ये वाहून गेले ते घेण्यासाठी आई गेली असता मुलगीदेखील तिच्या पाठीमागे गेल्याने वाहून गेली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन जवानांनी शोधकार्य सुरू करत मुलीचा मृतदेह सायंकाळी सहाच्यादरम्यान बाहेर काढला.
माधुरी ही बाहेरगावी असते; परंतु ती चार दिवसांसाठीच कोळेवाडी येथे आली होती व तिच्यासोबत अशी दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माधुरीचे आई-वडील हे मोलमजुरी करतात, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
माधुरीच्या मृत्यूला कोण जबाबदार?
ऐन पावसाळा असताना देखील कोळेवाडी गावामध्ये पाणीटंचाई असल्यामुळे तिच्या आईला कपडे धुण्यासाठी ओढ्यावर जावे लागले. त्यामुळेच हा मृत्यू झाला. पावसाळ्यातदेखील कोळेवाडीला टँकर मागवावा लागतो. जर मुबलक पाणी असते तर ही वेळ आलीच नसती. त्यामुळे याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत.