घरी टीव्ही पाहत असताना आजीसमोर अचानक उभा राहिला बिबट्या; प्रतिकार करत स्वतःला वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 03:08 PM2024-07-10T15:08:57+5:302024-07-10T15:09:35+5:30
बिबट्या माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना गोंधळून न जाता धैर्याने प्रतिकार केला म्हणून माझा जीव वाचला
मंचर : आंबेगाव तालुक्यातील कळंब व लौकी हद्दीवर असलेल्या सुंभेमळ्यात लक्ष्मीबाई खंडू थोरात (वय ७०) या घरी टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी घरात अचानकपणे बिबट्याने प्रवेश केला. घडलेल्या घटनेने घाबरून न जाता आजीने मोठ्या धैर्याने प्रतिकार केल्यामुळे स्वतःला वाचविण्यात त्यांना यश आले. बिबटे अगदी घरात येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लक्ष्मीबाई थोरात या गेल्या वर्षभरापासून सुंभेमळा येथे एकट्या राहतात. घराचा दरवाजा उघडा ठेवून लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे रात्री घरात एकट्या टीव्ही पाहत होत्या. आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश केला. कशाचातरी आवाज आल्याने आजी समोर पाहतात तर दोन फुटांच्या अंतरावर बिबट्या. अनाहूतपणे घडलेल्या घटनेमुळे पूर्णपणे गोंधळून न जाता क्षणाचाही विलंब न करता धैर्याने प्रतिकार करून त्यांनी मोठ्याने आरडाओरड केला. त्यानंतर बिबट्याने पोबारा केला होता. लक्ष्मण मारुती थोरात, अथर्व बळी थोरात, मोहन बबन थोरात, भरत लक्ष्मण थोरात आदी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात बिबट्या दत्तात्रेय राजाराम थोरात यांच्या उसाच्या शेतात निघून जाताना पाहिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वेळ रात्री ८ची होती. मी टीव्ही पाहत होते, त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. अचानकपणे बिबट्या घरात केव्हा आला, ते मला समजलेच नाही. आवाज आल्याने फिरून पाहिले, असता माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. गोंधळून न जाता धैर्याने प्रतिकार केला म्हणून माझा जीव वाचला आहे, असे लक्ष्मीबाई थोरात यांनी सांगितले.
लौकी, कळंब, चांडोली बुद्रुक आदी गावांत बिबट्यांनी शेळ्या, मेंढ्या, बैल व वासरांचा फडशा पाडला आहे. कळंब येथील सुंभेमळ्यात अगदी घरात येऊन बिबटे हल्ले करू लागले आहेत. अनेकदा नागरिकांना बिबट्याने दिवसा दर्शन दिले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.