कुजबुज १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:44+5:302021-08-22T04:14:44+5:30
आरे, कितीदा सांगायचे? पाया पडू नको आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना ...
आरे, कितीदा सांगायचे? पाया पडू नको
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या खूपच असते. नेत्यांचे लक्ष जावे, त्यांनी भेट द्यावी, यासाठी कार्यकर्ते कारण शोधत असतात. शुक्रवारच्या कोरोना आढावा बैठकीच्या वेळी असाच एक इच्छुक कार्यकर्ता अजित पवारांच्या भेटीसाठी ताटकळला होता. अजित पवारांची भेट मिळाल्यावर पक्षकार्यासाठी त्याने मोठ्या रकमांचे दोन चेक त्यांच्याकडे दिले. त्यावर अजित पवारांनी त्या कार्यकर्त्याचे आभार मानले. “तुमचा पत्ता, फोन नंबर द्या, पक्षाकडून तुम्हाला आभार व्यक्त करणारे लेखी पत्र येईल,” असेही सांगितले. त्यानंतर उत्साही कार्यकर्त्याने त्याच्या समाजकार्याचे फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता वेळ नाही, नंतर पाहू, असे म्हणत अजितदादांनी काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या कार्यकर्त्याने अजित पवारांचे पायच धरण्याचा प्रयत्न केला. एकदा सोडून दोनदा. तेव्हा अजित पवारांचा आवाज जरा चढलाच. ते म्हणाले, “अरे कितीदा सांगितले...पाया पडत जाऊ नका म्हणून.” त्या आवाजातली जरबच अशी होती की, तो कार्यकर्ता वरमून क्षणात बाजूला झाला.