कुजबुज २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:35+5:302021-07-18T04:09:35+5:30
पुण्याच्या राजकारणातील जुने ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत शिरोळे आणि सदानंद शेट्टी यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या निमित्ताने या ...
पुण्याच्या राजकारणातील जुने ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत शिरोळे आणि सदानंद शेट्टी यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या निमित्ताने या दोघांच्या अनोख्या विक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ती म्हणजे या दोघांचा हा कितवा पक्ष प्रवेश याची. शिरोळे यांचे घराणेच कॉंग्रेसचे. साहजिकच श्रीकांत शिरोळे यांचीही राजकीय कारकिर्द कॉंग्रेसमधूनच सुरू झाली. पुढे काही काळ ते शंकरराव चव्हाण यांच्या ‘मस्का’ म्हणजेच ‘महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस’मध्ये होते. पुन्हा ते कॉंग्रेसमध्ये परतले. दरम्यान शिवसेनेशी जवळीक, अपक्ष हेही झाले. पुणे विकास आघाडीमध्ये ते काही काळ होते. एवढे करून पुन्हा ते कॉंग्रेसमध्ये परतले. पण कॉंग्रेसमध्ये सावळागोंधळ असल्याचे सांगत श्रीकांत शिरोळे यांनी आता ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला आहे. या घरात आता त्यांचा मुक्काम कधीपर्यंत हे येणारा काळच सांगेल. जे शिरोळोंचे तेच शेट्टींचे. जनता पक्ष, कॉंग्रेस, पुणे विकास आघाडी, शिवसेना, पुन्हा कॉंग्रेस आणि आत्ता राष्ट्रवादी अशी शेट्टींची राजकीय कारकिर्द आहे. ‘बारा गावचे पाणी प्यायलेला’ अशी जुनी म्हण आहे. त्याच धर्तीवर ‘बारा पक्षांचे झेंडे खांद्यावर वाहिलेल्या’ या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना पक्षात घेताना अजित पवारांनी नक्कीच काहीतरी आडाखे बांधले असतील.
इंदापुरातली भाऊबंदकी
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यातल्या तालेवार राजकीय घराण्याचे प्रतिनिधी. सन १९९५ ते २०१४ असे सलग १९ वर्षे ते राज्याच्या मंत्रिमंडळात होते. राज्यात सत्ता कोणाचीही असो, मुख्यमंत्री कोणीही होवो स्वत:चे मंत्रिपद कायम राखण्यात पाटील नेहमीच यशस्वी झाले. त्यामुळे सन २०१४ पर्यंत राज्याचे मंत्री म्हणून ते अगदी अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांनाही जिल्ह्यात ‘सिनियर’ होते. पण सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या विक्रमी कारकिर्दीला ‘ब्रेक’ लागला. सन २०१९ मध्ये पुन्हा त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्दच आता निर्णायक वळणावर आहे, असे म्हणतात. त्यामुळेच बहुधा त्यांच्या परिवारातल्याच ज्येष्ठ सदस्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सन २०२४ मध्ये पुन्हा इंदापूर जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या हर्षवर्धन यांना या भाऊबंदकीचा फटका बसेल, अशी चर्चा त्यामुळेच तालुक्यात सुुरू झाली आहे. एकेकाळच्या जिल्ह्यातल्या सर्वात ‘सिनियर’ मंत्र्यांसाठी आता इंदापुरात वर्चस्व राखणेही खडतर होत चालले आहे.
...आणि भोंदू ज्योतिषाची वळली बोबडी
गेल्या आठवड्यात शहरात एका कथित ज्योतिषाचार्याला पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली होती. चतु:शृंगी पोलिसांनी अतिशय नियोजनबद्धरीत्या सर्व पुरावे गोळा केल्यानंतर या ज्योतिषाचार्याला पोलीस ठाण्यात बोलावले गेले. त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्याचवेळी दुसरीकडे त्यांच्या अटकेची प्रकिया सुरू करण्यात आली. या मधल्या वेळेत या ज्योतिष महाशयांनी स्वत:ची शेखी तिथल्या पोलिसांपुढे मिरवण्यास सुरुवात केली. तेवढ्यावर तो गप्प बसला नाही. तिथल्या पोलिसांना हात दाखवण्यास सांगितले. पण तो पोलीस हुशार होता. त्यामुळे त्याने स्वत:चा हात त्या ज्योतिषाला दिला नाही. उलट मनातल्या मनात त्यालाच हसू आलं की “ज्याला स्वत:चं भविष्य कळत नाही तो माझा हात कसा बघणार?” एवढे झाल्यावर तर त्या ज्योतिषाने गप्प बसावे की नाही? पण त्याने दुसऱ्या पोलिसाला हात दाखवण्यास सांगितले. त्यावर दुसरा पोलीस त्याला म्हणाला, “माझा हात पाहता? तुमच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे माहिती आहे का?” अर्थातच काहीच मिनिटांनी जेव्हा पोलीस कोठडीत बंद होण्याची वेळ आली तेव्हा या ज्योतिषाची बोबडी वळली.