कुजबूज २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:33+5:302021-09-05T04:16:33+5:30
‘पुुणे राष्ट्रवादी’त अंतिम शब्द यांचाच पुण्यातील ॲॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा विषय सत्ताधारी भाजपाने आणला. या विषयाला पाठिंबा द्यायचा की ...
‘पुुणे राष्ट्रवादी’त अंतिम शब्द यांचाच
पुण्यातील ॲॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा विषय सत्ताधारी भाजपाने आणला. या विषयाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा, यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच तिरफाळ्या उडाल्या. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार सदस्य असूनही तिथे हा विषय मंजूर झाला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोधी सूर काढला. पुन्हा माजी शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांनी या मुद्यावर थेट पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेमके काय चालले आहे तेच यामुळे पुणेकरांना कळेना. खासदार चव्हाणांनी पाठिंबा देऊन चोवीस तास उलटण्याच्या आधीच पुन्हा जगताप यांनी पत्रकार परिषद घेत ॲॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या भाजपाच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा विरोध जाहीर केला. राष्ट्रवादीत या विषयावरून अजिबात एकमत नाही हे यावरून पुणेकरांच्या पक्के लक्षात आले. पण ‘ॲॅमेनिटी स्पेस’नी ‘राष्ट्रवादी’ पक्षांतर्गतही एकमेकांमध्ये खूप अंतर उभं केलं आहे हेही स्पष्ट झालं. विशेषत: जगताप यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन स्वत:च्याच पक्षाच्या नगरसेवकांवरचा अविश्वास चव्हाट्यावर आणला तेव्हा अंतर्गत मतभेद प्रकर्षाने उघड झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची भाषा जाहीरपणे करण्याची गरज होती का? संशयित नगरसेवकांना अजित पवारांच्यापुढे उभे करुन विषयाची तड लावता आली नसती का? असे प्रश्न दबक्या आवाजात विचारले जात आहेत. जगतापांनी जाहीरपणे पोरकटपणा केला तो केला पण अनुभवी, ज्येष्ठ अजित पवारांनी तरी संबंधित नगरसेवकांना चारचौघात का झापले याचीही चर्चा सुरु आहे. अजित पवारांनी ज्या पद्धतीने प्रशांत जगताप यांचे समर्थन केले त्यावरुन एक धडा मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी नक्कीच घेतला. तो म्हणजे पुणे राष्ट्रवादीत अंंतिम शब्द एकाचाच चालेल. तो म्हणजे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा.
------------
सौ सुनार की एक ‘पवार’ की
सुमारे दीड-दोन वर्षभरापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी बारामतीत जाऊन शरद पवार यांच्याकडे आमरस-पुरीचा पाहुणचार खाऊन आले. विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या आमदारांमध्ये शेट्टी यांचा क्रमांक लागावा यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात आले. आयुष्यभर सहकारसम्राट आणि प्रामुख्याने शरद पवार यांचा कडवा विरोध करत उभे राहिलेले शेट्टींचे नेतृत्त्व पवारांच्या आश्रयाला गेल्याचे पाहून त्यांच्या संघटनेतल्या अनेकांना तीव्र दु:ख झाले. फसवले गेल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. येथे गळ माशापर्यंत पोहोचला नव्हता. मासाच स्वत:हून गळाला लागला होता. त्यामुळे शेट्टींच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं दु:ख अधिक गहिरं होतं. पण शेट्टींचं दुर्दैव असं की राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून आमदार होणार ही नुसती चर्चाच त्यांना गेले दीड-दोन वर्षं नुसतीच ऐकावी लागत आहे. कारण राज्यपाल महोदय काही निर्णय घ्यायला तयार नाहीत. त्यामुळं आमदारकीचा टिळा तर लागत नाही पण ‘राष्ट्रवादी’शी संग केल्याची बदनामी मात्र येताजाता झेलावी लागते अशी त्यांची गत झाली. हे कमी की काय म्हणून महाआघाडी सरकारने आमदारकीसाठी राज्यपालांकडे दिलेल्या बारा नावांमधून शेट्टींचे नाव वगळल्याचा धुरळा अचानक गेल्या चार दिवसांमध्ये उठला. त्यामुळं शेट्टींचीही चिडचिड झालीच. त्यांच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाला अनुसरुन लगेच ते तिखट बोलून मोकळे झाले. त्यानंतर अजित पवारांनी खुलासा केला. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी स्पष्टीकरण दिले. तरी नेमकं काय, शेट्टींचं नाव आहे की वगळलं हे कळेना. अखेर शरद पवार यांनीच ‘आमचा शब्द आम्ही पाळला. आता राज्यपालांनी निर्णय घ्यायचा आहे,’ हे स्पष्ट करुन विषय संपवला. शेट्टींना काय बोलायचं ते बोलू द्या, अशा कानपिचक्याही द्यायला ते विसरले नाहीत. सौ सुनार की एक ‘पवार’ की. आता कोणी काही बोलू द्या.