कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:54+5:302021-07-04T04:07:54+5:30

----------- भाजपचा ढोंगी आक्रोश कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता काळात म्हणजेच सन २०१४ पूर्वी राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री मोठ्या प्रमाणात ...

Whisper | कुजबुज

कुजबुज

Next

-----------

भाजपचा ढोंगी आक्रोश

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता काळात म्हणजेच सन २०१४ पूर्वी राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून ते शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत काही मोजक्या मंडळींनीच त्या विरोधात जोरदार आघाडी त्यावेळी उघडली होती. न्यायालयातही याचिका दाखल झाल्या. त्यावेळी विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपनेही सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीविरोधात आवाज उठवला होता. येथवर ठीक होते, पण २०१४ मध्ये भाजप राज्याच्या आणि देशाच्या सत्तेत आली. त्यावेळी त्यांना सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची सखोल चौकशी करता आली असती. मात्र राजकीय हिशोब डोळ्यापुढे ठेवून भाजपने पाच वर्षे काहीच केले नाही. पाच वर्षांनी राज्यातली सत्ता गेल्यानंतर मात्र पुन्हा त्यांना या विषयाची आठवण झाली आहे. त्यामुळेच पाच वर्षे ईडी काय झोपली होती का, हा राजू शेट्टी यांचा प्रश्न अचूक आहे. सहकारी कारखान्यांच्या विक्रीला आता दहा-बारा वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. दरम्यानच्या काळात कागद रंगवण्याची, लपवालपवी करण्याची भरपूर संधी संबंधितांना मिळालेली आहे. नव्हे ती राजकीय सोयीपायी देण्यात आली आहे. त्यामुळेच आता करा कोणाला काय चौकशी करायची ती, अशी उद्दाम भाषा काहीजण करू शकतात. मात्र यावर बोलण्याचा अधिकार भाजपला किती याचे आत्मपरीक्षण भाजपच्या नेत्यांनी करावे. कारण खरोखरीच त्यांना सहकार क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची चाड असती तर पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी या विषयाचा सोक्षमोक्ष लावला असता. आता भाजपकडून दाखवला जाणारा आक्रोश हा ढोंगी असल्याचे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणू लागले आहेत ते त्यामुळेच.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.