कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:20+5:302021-09-26T04:11:20+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी येणार म्हणून या परिसरात पुष्कळच ‘फ्लेक्स बाजी’ झाली. त्या ...
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी येणार म्हणून या परिसरात पुष्कळच ‘फ्लेक्स बाजी’ झाली. त्या ‘फ्लेक्स’ची संख्या पाहून पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी भन्नाट कल्पना मांडली. ते म्हणाले, “विकासकामे करताना पैशांची कमतरता भासू नये म्हणून फ्लेक्स लावणाऱ्यांकडून लाखो रुपयांची निधी घ्यावा. फ्लेक्स न लावता निधी देणाऱ्यांची नावे कोनशिलेवर टाकावीत.” त्यावर जोरदार हशा पिकला. बापट यांनी केलेली ही सूचना ऐकायला व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते आणि गडकरीही होते. आता त्यांनी मनावर घेतलेच तर भाजपच्या ‘फ्लेक्सवीरां’ची खैर नाही, अशीच चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली. भरीस भर म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारही पालकमंत्री या नात्याने उपस्थित होते. अजितदादांनाही फ्लेक्स फंडांची कल्पना आवडली तर ‘राष्ट्रवादी’च्या फ्लेक्सवीरांनाही कोनशिलेवर झळकण्याची संधी मिळेल, अशीही कुजबूज झाली. बापट यांच्यानंतर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी बापट यांना चिमटा काढताना म्हटले, ‘पुण्यात सर्वात जास्त फ्लेक्स तुमच्याकडूनच लावले जातात. त्यामुळं फ्लेक्स फंडाची सुरुवात तुमच्या खिशातूनच करावी लागेल.’ त्यावर पुन्हा एकदा हशा पिकला.
------
‘दादा, दोन तासांत कोल्हापूर’
मोठी स्वप्ने पाहण्यात आणि ती लोकांना रंगवून सांगण्यात नितीन गडकरी यांचा हात धरणे फार कमी जणांना जमेल. भविष्यातील मोठमोठ्या प्रकल्पांची, नव्या कल्पनांची माहिती ते अशी सांगत राहतात की ऐकणाऱ्यांना सद्य:स्थितीतल्या अडचणींचा विसरच पडावा. एका कार्यक्रमात पुण्यात बोलताना ते म्हणाले की, ‘पुणे-बंगळुरू’ महामार्गाची आखणी सुरू आहे. हा नवा मार्ग पर्यावरणपूरक असेलच शिवाय वेगवानही. व्यासपीठावर बसलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, “या नव्या मार्गावरून दादा, तुम्ही दोन तासांत कोल्हापूरला पोहोचू शकाल.” महामार्गाचा दर्जा पटवून देण्यासाठी गडकरी हे बोलले असणार. पण गडकरींच्या या साध्या विधानावरही श्रोत्यांमध्ये हशा पिकला. कोथरूडमधून आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वीही त्यांना ‘कोल्हापूरला परत पाठवा’ असा प्रचार त्यांच्या विरोधकांनी केला होता. निवडून आल्यानंतरही ‘बाहेरचा आमदार’ असाच प्रचार त्यांचे विरोधक करत राहतात. या पार्श्वभूमीवर ‘गडकरीही चंद्रकांत पाटील यांना दोन तासांत कोल्हापूरला पाठवत आहेत,’ असा विचार करून श्रोत्यांमधल्या काहीजणांना हसू फुटले.
---------
‘तीन सदस्यीय’ची कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धास्ती?
सन २०१७ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत होती. त्यावेळी पुण्यात चार सदस्यीय प्रभागरचना करून भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आणि इतिहासात पहिल्यांदाच पुणे महापालिका स्वबळावर जिंकली. आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. पुण्यात तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. पण त्यानंतर पुण्यातल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या पद्धतीच्या निवडणुकीत यश मिळवणे अवघड जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. पालकमंत्री अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत निर्णयावर फेरविचार करण्याचे सूतोवाच केले. यामुळे राज्यात सत्ताधारी असून आणि त्यात पुन्हा तीन पक्षांची ताकद एकत्र येण्याची शक्यता असतानाही दोन्ही कॉंग्रेसला धास्ती कशाची वाटते हे समजेना झाले आहे. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा फायदा भाजपलाच होईल हे पिल्लू कोणी सोडले यावर तर्क लढवले जात आहेत.