शीळवादनाचा अनोखा विक्रम कोची येथे घडणार; पुण्यातील ४ कलाकारांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:11 PM2018-02-24T12:11:26+5:302018-02-24T12:11:26+5:30
विक्रम म्हटला की आपल्याला कौतुकामिश्रित आश्चर्यही वाटते, असाच एक अनोखा विक्रम रविवारी (दि. २५) कोची येथे घडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन ‘इंडियन व्हिसलर्स असोसिएशन’ या संस्थेने केले आहे.
पुणे : आपण दैनंदिन आयुष्यात खूप व्यस्त असतो. रोजची धावपळ, कामाचा व्याप आणि ताणतणाव सारेच अपरिहार्य असते. पेपरवाचन किंवा वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहात असताना अचानक आपली नजर एका बातमीवर स्थिरावते आणि आपले कुतूहल जागृत होते. मग तो सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहलीचा विक्रम असो. विक्रम म्हटला की आपल्याला कौतुकामिश्रित आश्चर्यही वाटते, असाच एक अनोखा विक्रम रविवारी (दि. २५) कोची येथे घडणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन ‘इंडियन व्हिसलर्स असोसिएशन’ या संस्थेने केले आहे. हा कार्यक्रम उद्या (रविवारी) कोची येथील म्युनसिपल टाऊनशिप हॉलमध्ये दुपारी २ ते ५ या वेळेत सादर होणार आहे. या अनोख्या विक्रमामध्ये सहभागी होणारे मोहन (आप्पा) कुलकर्णी या विक्रमाविषयी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, या संस्थेची स्थापना मूळ पुण्याच्या पण सध्या मुंबईत कार्यरत असलेल्या ॠग्वेद देशपांडे या तरुणाने केली आहे.
विक्रमाची तयारी करणे एक आव्हानच होते. आपले सहकारी त्यांनी एकत्र केले. ही गाणी उत्तम पद्धतीने सादर केली जावीत यासाठी शीळवादकांची नोंदणी करताना प्रत्येकाची चाचणी घेऊन कलाकारांची निवड करण्यात आली. कडक अटी आणि कठोर नियमावली तयार करण्यात आली.
प्रत्येकाला ‘सारे जहाँसे अच्छा’ आणि ‘हम होंगे कामयाब’ या गाण्यांचे ‘कराओके ट्रँक्स’ बनवून देण्यात आले. बारीकसारीक तपशीलवार माहिती देण्यात आली. सध्या देशविदेशातून कोचीमध्ये आलेल्या शीळवादक कलाकारांचा सराव जोरात चालू आहे.
दोन्ही गीते ताकदीने आणि पूर्ण तयारीनिशी सादर करण्यासाठी सर्व जण उत्सुक आहेत. या विक्रमामध्ये माझ्यासह किरण गांधी, यतीन जोशी, तेजस भावे सहभागी झाले आहेत.
’सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘हम होंगे कामयाब’ ही गीते एका अनोख्या वाद्यावर म्हणजे शिळेवर तब्बल दीडशे कलाकार सादर करणार आहेत.
केवळ सूर आणि आघात यातून यापूर्वी पन्न्नास शीळवादक कलाकारांचा विक्रम दीडशे कलाकार मोडून काढणार आहेत. यामध्ये पुण्यातील चार शीळवादकांचा समावेश आहे.
इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स, आशिया बुक आॅफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स आणि बेस्ट आॅफ इंडिया या रेकॉर्डसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.