महामंडळाची शिवशाही बससेवा ठरतेय पांढरा हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:26 IST2019-01-07T23:26:08+5:302019-01-07T23:26:35+5:30
पळसदेव : शिवशाही बस आता परिवहन विभागासाठी पांढरा हत्ती ठरू लागल्याचे चित्र आहे. भादलवाडी परिसरात एकाच दिवशी दोन शिवशाही ...

महामंडळाची शिवशाही बससेवा ठरतेय पांढरा हत्ती
पळसदेव : शिवशाही बस आता परिवहन विभागासाठी पांढरा हत्ती ठरू लागल्याचे चित्र आहे. भादलवाडी परिसरात एकाच दिवशी दोन शिवशाही बस महामार्गावरच बंद पडल्याचे चित्र होते. त्यामुळे सुखद प्रवासासाठी शिवशाहीची निवड करणाऱ्या प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिवहन खात्याने तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन ममहामंडळाकडून खासगी बस कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिवशाही बससेवा सुरू केली. आरामदायी सेवेमुळे प्रवाशांनी या बससेवेला प्रतिसाद दिला. मात्र, या शिवशाही बस सतत चर्चेत आहेत. कधी बसचालक मद्य धुंद अवस्थेत बस चालविणे, बस महामार्गावर बंद पडणे यामुळे शिवशाही बस चर्चेत आली आहे. रविवारी तर चिंचवड येथील वर्कशॉपमधून बाहेर पडणाºया शिवशाही बसने अचानक पेट घेतला होता. शिवशाही बसमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला असला, तरी बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास होत आहे. रविवारी (दि. ६) सकाळी भादलवाडी येथे बस बंद पडली होती. तर, रविवारी मध्यरात्री पोंधवडी गावाजवळ शिवशाहीची अशीच बस बंद पडली. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले. यामुळे ‘शिवशाहीचे चाललेय काय?’ असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. पोंधवडी येथील बंद पडलेली बस सोमवारी (दि. ७) दुपारी इंदापूर आगाराकडे नेण्यात आली.