कोरोनाच्या नावाखाली केलेल्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:51+5:302021-08-19T04:14:51+5:30
पुणे : कोरोना महामारीच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सर्व नियम बाजूला ठेवून अनेक चुकीची कामे करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप ...
पुणे : कोरोना महामारीच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सर्व नियम बाजूला ठेवून अनेक चुकीची कामे करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत, शहर काँग्रेसने या निषेधार्थ बुधवारी पुणे महापालिकेत आंदोलन केले़ या वेळी कोरोनाच्या नावाखाली केलेल्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनवेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते आबा बागुल, अरविंद शिंदे, अॅड. अभय छाजेड, संजय बालगुडे, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, लता राजगुरू, वैशाली मराठे, वीरेंद्र किराड यांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले़ या वेळी कोरोनाकाळात केलेल्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले असून, येत्या आठ दिवसांत सर्व प्रकरणांबद्दल माहिती घेऊन सप्टेंबरमध्ये कोविडच्या संदर्भात मुख्य सभा घेतली जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे बागवे यांनी सांगितले.
रमेश बागवे यांनी भाजप व प्रशासनाने संगनमताने कोविडच्या काळात निविदा न काढता तसेच वाढीव दराने साहित्य खरेदी केली असल्याचा आरोप केला़ सन २०२१-२०२२ यामध्ये ५७५ कोटींची फक्त आरोग्य विभागाची तरतूद तसेच वाहतूक विभाग, विद्युत विभाग, क्षेत्रीय कार्यालय व सभासदांच्या यादीची तरतूद याचप्रमाणे आमदार, खासदारांचे निधी व पुणे महापालिकेला शहरातून आलेला साहाय्य निधी व साहित्य आले असताना कशाप्रकारे महापालिकेने कुठले खर्च केले याची तपशीलवार माहिती पुणेकरांना दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
---------------------------
फोटो - काँग्रेस प्रोटेस्ट