'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:22 AM2024-05-08T06:22:09+5:302024-05-08T06:23:13+5:30
पुणे : आमदार दत्ता भरणेंनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मतदानाच्या दिवशी शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. आमदार राेहित पवार ...
पुणे : आमदार दत्ता भरणेंनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मतदानाच्या दिवशी शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. आमदार राेहित पवार यांनी याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले.
हा प्रकार घडल्यानंतर खासदार सुळे त्या कार्यकर्त्याच्या भेटीला गेल्या. त्यांनी कार्यकर्ते नाना गवळींशी संवाद साधला. ‘बूथवरून काही वाद झाला नाही. भरणे त्यांच्या कारमधून उतरले. बूथवर गर्दी होती. त्यामुळे मी जरा बाजूला गेलो होतो. भरणे तेथे आले आणि त्यांनी थेट शिवीगाळच सुरू केली,’ असा घटनाक्रम गवळींनी कथन केला.
या प्रकरणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणात आपली कोणतीही चूक नसल्याचा दावा केला. संबंधित कार्यकर्ता हा बूथ केंद्रावर पैसे वाटत होता किंवा दमदाटी करीत होता. त्याला लोकांनी फटके मारले असते. त्यामुळे मी त्याला ग्रामीण भाषेत रागावलो. शिवीगाळ केली नसल्याचा दावा भरणे यांनी केला.
ऐन निवडणुकीच्या काळात राज्यात धमक्या व मतदारांना पैसे देण्याचे प्रकार अनुभवास आले. अदृश्य शक्तीमुळेच हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ झाले आहे. हे चित्र अस्वस्थ करणारे व वेदना देणारे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
बारामतीत पैशांच्या वाटपाची जोरदार चर्चा
बारामतीत मतदानाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी पैशांचे वाटप झाल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला. या गटाचे आमदार रोहित पवार यांनीही मंगळवारी पुण्यात बोलताना या आरोपांचा पुनरुच्चार केला.
बारामतीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संदीप गुजर तसेच युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. बँकेचे कामकाज सर्वसाधारणपणे सामान्य लोकांसाठी दुपारनंतर संपते. मात्र, एका बँकेचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी टीका त्यांनी केली. त्याचप्रमाणे विरोधी गटाची सत्ता असलेल्या सहकारी संस्थांमधील कर्मचारीही बारामतीमध्ये फिरत होते, असे रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवारांवर परिणाम झालाय : अजित पवार
रोहित पवार यांनी केलेले पैसेवाटपाचे सर्व आरोप धादांत खोटे आहेत, रोहित पवार यांच्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे ते बेछूट आरोप करीत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पुणे जिल्हा बँक मध्यरात्री उघडी होती, कोणी प्रसिद्धिमाध्यमांनी पाहिले आहे का? हा व्हिडीओ नक्की रात्रीचा आहे की यापूर्वीचा आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. मलासुद्धा आरोप करता येतात. पैसे वाटल्याचा आरोप करीत असतील तर सर्वत्र त्या-त्या ठिकाणी पोलिस आहेत. निवडणूक निरीक्षकांसह शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे हे सर्व गैरप्रकार पाहण्याचे काम यंत्रणेचे आहे. आपण कधीही असले गैरप्रकार करीत नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला.