नराधम दत्ता गाडेने गुन्ह्यानंतर कोणाला केला कॉल?; पोलिसांकडून शेतात मोबाईलचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:26 IST2025-03-02T18:24:27+5:302025-03-02T18:26:10+5:30
आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या विविध दाव्यांमुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.

नराधम दत्ता गाडेने गुन्ह्यानंतर कोणाला केला कॉल?; पोलिसांकडून शेतात मोबाईलचा शोध सुरू
किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे |
Swargate Rape Case: पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे या नराधमाने २६ वर्षीय पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे पोलिसांवरही फरार असलेल्या गाडेच्या अटकेसाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर तीन दिवसांनी पोलिसांनी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलं. मात्र आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या विविध दाव्यांमुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे.
दत्ता गाडे याने त्याचा मोबाईल शिरूरमध्ये एका शेतात लपवल्याची माहिती आहे. घटना घडल्यावर आरोपीने मोबाईलवरून कोणा-कोणाला फोन केले याचा तपास केला जाणार आहे. तसंच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशनवरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का, याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे.
दरम्यान, पोलिसांकडून आरोपीचा मोबाईल शोधण्याचे काम सध्या सुरू असून त्याच्या मोबाईलमधून नक्की काय गौप्यस्फोट होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा आरोपीचा प्रयत्न
आरोपीबाबत अनेक वावड्या उठल्या आहेत. तो समलैंगिक असून, त्याद्वारे तो पैसे मिळवायचा. यापूर्वी आरोपी दत्तात्रय याने पोलिसांना तृतीयपंथी असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांपासून बचाव कसा करायचा, याबाबत आरोपीला चांगलीच माहिती असून तो शातीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.