कुणी शिक्षक देता का शिक्षक?
By admin | Published: June 26, 2016 04:39 AM2016-06-26T04:39:27+5:302016-06-26T04:39:27+5:30
प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. मात्र, या शिक्षणाला अपुऱ्या शिक्षकांच्या संख्येचे ग्रहण
खोर : प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. मात्र, या शिक्षणाला अपुऱ्या शिक्षकांच्या संख्येचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात अनेक शाळांत शिक्षकच नसल्याने ग्रामस्थांवर कुणी शिक्षक देता का शिक्षक, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी डी. एड. झालेल्या स्वयंसेवक तरुणांची मनधरणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबरोबरच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचे ग्रहण लागले आहे. यामुळे एका शिक्षकावर अनेक वर्गांत शिकविण्याची जबाबदारी पडली आहे. यामुळे दर्जेदार प्राथमिक शिक्षणापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.
दौंड तालुक्यात गेल्या महिन्यात प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये खोरमधील खोर गावठाण, चौधरीवाडी, पाटलाचीवाडी, माने-पिसेवस्ती, डोंबेवाडी, हरिबाचीवाडी, पिंपळाचीवाडी या सर्वच शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या. खोरला ४ शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या, देऊळगावगाडा केंद्रात ६ जागा रिक्त ठेवण्यात आल्या. उन्हाळ्याची सुटी संपून शाळा सुरू होऊन आठवडा झाला. विद्यार्थ्यांचे वाजतगाजत शाळेत स्वागत करण्यात आले. मात्र, शिक्षकच नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गावातीलच डी. एड. झालेल्यांना स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी व शिक्षकांना मदत म्हणून कामकाज पाहण्यासाठी विनंती करण्याची वेळ आली आहे. एकीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयएसओ करण्याच्या मोठमोठ्या घोषणा करीत आहेत आणि दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षक उपलब्ध होत नाहीत, ही खेदाची बाब आहे.
जिल्हा परिषदेच्या बेजबाबदार कारभारामुळेच पालक सध्या इंग्लिश मीडियम व माध्यमिक शाळांचा दरवाजा ठोठावत असतानाचे चित्र आहे. शिक्षक भरती होत नसल्याने रिक्त जागेवर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गावातीलच महिलांना अथवा पुरुषांना ग्रामपंचायत मानधन तत्त्वावर किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दरमहा पैसे देऊन शिकविण्याची वेळ सध्या
आली आहे.
असे मिळणार मानधन...
खोर जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे गावातील २ महिलांना सहायक शिक्षक म्हणून ग्रामस्थांच्या वतीने संधी मिळाली आहे. एका शिक्षिकेचे मानधन ग्रामपंचायत देणार, तर दुसऱ्या शिक्षिकेचे मानधन शाळा व्यवस्थापन समिती देणार.
डी .एड.चे शिक्षण आले अंगलट
शिक्षकांच्या भरतीच्या स्थगितीमुळे अनेक होतकरू व हातउसने पैसे घेऊन डी.एड.चे शिक्षण पूर्ण केलेली अनेक मुले-मुली सीईटीची परीक्षा केव्हा निघेल व आपण शाळेमध्ये केव्हा रुजू होऊ, याकडे त्यांच्या नजरा आहेत.
डी.एड.चे शिक्षण घेऊनही बेरोजगार राहण्याची वेळ आल्याची भावना या तरुणांची झाली आहे.
देऊळगावगाडा केंद्रामध्ये खोर गावठाणमध्ये १ जागा, चौधरीवाडी शाळेमध्ये २ जागा, डोंबेवाडी शाळेमध्ये १ जागा, विजयवाडी (कुसेगाव) शाळेला १ जागा, माळीमळा (पडवी) शाळेला १ जागा मिळून केंद्रात तब्बल सहा शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
- महेंद्रकुमार मोरे, केंद्रप्रमुख, देऊळगावगाडा