पीएमपीच्या अकार्यक्षम सेवेचे उत्तरदायित्व कोणाकडे..? प्रवाशांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:00 AM2019-07-26T07:00:00+5:302019-07-26T07:00:02+5:30

कोट्यवधी रूपयांची मदत दरवर्षी होत असूनही पीएमपी ही प्रवासी सेवा प्रवाशांना तापदायकच ठरते आहे.

Who has responsibility for PMP's inefficient service | पीएमपीच्या अकार्यक्षम सेवेचे उत्तरदायित्व कोणाकडे..? प्रवाशांचा सवाल

पीएमपीच्या अकार्यक्षम सेवेचे उत्तरदायित्व कोणाकडे..? प्रवाशांचा सवाल

Next
ठळक मुद्देप्रवाशांचा सवाल: बेपर्वाई, बेजबाबदारपणा,हितसंबंधांची जपणूक

पुणे : कोट्यवधी रूपयांची मदत दरवर्षी होत असूनही पीएमपी ही प्रवासी सेवा प्रवाशांना तापदायकच ठरते आहे. नागरिकांच्या कराचा पैसा खर्च होत असलेल्या या सार्वजनिक प्रवासी सेवेचे उत्तरदायित्व आहे तरी कोणाकडे? असा उद्विग्न सवाल प्रवाशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी '' लोकमत'' च्या व्यासपीठावर गुरूवारी उपस्थित केला. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय सुचवण्यासाठी म्हणून ' लोकमत' ने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या चर्चासत्रात पीएमपीवरचे आक्षेप व अपेक्षा यावर चर्चा झाली. बहुतेकांनी या सेवेबद्दल अनेक आक्षेप नोंदवत ह्यजबाबदारी निश्चित केल्याशिवाय त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, असे रोखठोक मतही ऐकवले.
प्रवासी सेवा मंचचे अध्यक्ष जुगल राठी तसेच संजय शितोळे, निळकंठ मांढरे, आशा शिंदे, विपूल पाटील, रुपेश केसेकर, सतीश चितळे यात सहभागी झाले होते. ' पीएमटी'चे विलिनीकरण करण्याचा उद्देशच व्यावसायिक पद्धतीने कामकाज होऊन प्रवाशांना उत्तम व कार्यक्षम सेवा मिळावी असा होता. मात्र तसे काम होत नसल्याने हा उद्देश सफल झाला नसल्याचे मत या सर्वांनी नोंदवले. वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी आक्षेप घेतले असले तरीही ही सेवा चांगली होणे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. चुकीची धोरणे, अभ्यासाचा अभाव, दृष्टिकोन प्रवासी केंद्रीत असण्याऐवजी वैयक्तिक हितसंबध सांभाळणारा असणे अशी विविध कारणे त्यांनी सांगितले.
शहरातील वाहतूकीच्यागर्दीत फेऱ्या मारणे सुलभ व्हावे यासाठी २२ व ३२ आसनांच्या लहान बस घेण्यात आल्या व त्यालगेचच शहराभोवताली असणाऱ्या उपनगरांमध्ये त्या पाठवण्यात आल्या. हा निर्णय कोणी घेतला, कशासाठी घेतला, याचे उत्तर कोणीही अधिकारी देत नाहीत. बस थांब्यांसाठी स्वतंत्र विभाग असूनही थांब्यांवर कसलीही व्यवस्था का नाही? बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. वाहक, चालक प्रवाशांबरोबर उद्धटपणे बोलतात, मुठभर असणाऱ्या प्रवाशांसाठी दीड कोटी रूपयांची एक याप्रमाणे वातानुकुलीत बस खरेदी करण्यात येतात व त्याचा आर्थिक बोजा प्रवासाचे दुसरे कोणतेही साधन नाही म्हणून पीएमपी वापरणाऱ्या गरीब प्रवाशावर टाकण्यात येतो अशी अनेक निरिक्षण व गंभीर आक्षेप या चर्चेत नोंदवण्यात आले.
या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास पीएमपी मधील कोणीही बांधील नाही. प्रवासी नावाच्या एका मोठ्या जनसमुदायाबरोबर रोज संबध येणाऱ्या संस्थेत आपण काम करतो आहोत याचे भानच वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत एकालाही नाही. त्यामुळेच या सेवेचे किंवा त्यामधील वेगवेगळ्या घटकांचे उत्तरदायित्व त्यात्या घटकांशी संबधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निश्चित केले पाहिजे. कामात चुक झाली की विचारणा होणार, चौकशी होणार, कारवाई होणार असे वाटल्याशिवाय या सेवेत कसलीही सुधारणा होणार नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून या सेवेच्या चुका समोर आणणे भाग आहे असे या प्रवाशांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ही सेवा सुधारली तर पुण्यातील वाहतूकीची सध्याची समस्या किमान काही टक्क्यांनी तरी कमी होईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Who has responsibility for PMP's inefficient service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.