Lalit Patil: ललित पाटील प्रकरणातील ‘ससून’मधील जबाबदार अधिकाऱ्यांना वाचवतंय काेण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 10:37 AM2024-07-05T10:37:34+5:302024-07-05T10:37:45+5:30

ललितला एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पलायन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते...

Who is saving the responsible officers in 'Sassoon' in Lalit Patil case? | Lalit Patil: ललित पाटील प्रकरणातील ‘ससून’मधील जबाबदार अधिकाऱ्यांना वाचवतंय काेण?

Lalit Patil: ललित पाटील प्रकरणातील ‘ससून’मधील जबाबदार अधिकाऱ्यांना वाचवतंय काेण?

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याने ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री आठच्या सुमारास पलायन केले होते. ललितला पळून जाण्यास मदत करणाऱ्या आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस खात्यातून बुधवारी (दि. ४) बडतर्फ करण्यात आले. पोलिस हवालदार आदेश सीताराम शिवणकर आणि पोलिस शिपाई पिराप्पा दत्तू बनसोडे अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबतचे आदेश अपर पोलिस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया यांनी दिले आहेत.

दरम्यान, पलायन प्रकरणानंतर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यांची या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू होती. चौकशीअंती ही कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, पोलिस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव या तिघांना बडतर्फ केले हाेते. या प्रकरणात बडतर्फ केलेल्यांची संख्या पाच झाली आहे.

अधिक माहितीनुसार, पोलिस कर्मचारी शिवणकर, काळे, बनसोडे आणि जाधव असे चौघेजण २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातील तेव्हाचा कैदी वॉर्ड क्रमांक १६ येथे गार्ड कर्तव्यावर होते. त्यांच्यावर देखरेख अधिकारी म्हणून मोहिनी डोंगरे होत्या. आरोपी ललित पाटील याने त्याच रात्री आठच्या सुमारास पोलिस कर्मचारी काळे यांच्या ताब्यात असताना ससून रुग्णालयातून पळ काढला.

ललितला एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पलायन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ललित पाटील याने पळ काढल्याच्या घटनेनंतर देखील कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री उशिरा म्हणजेच सव्वादहाच्या सुमारास दिली. त्यामुळे आरोपीला पळून जाण्यास संधी मिळाली. हा प्रकार घडला तेव्हा पोलिस कर्मचारी शिवणकर आणि बनसोडे हेही तेथे उपस्थित होते.

ललित पाटील पळाल्यानंतर दोघांनी नियंत्रण कक्षाला त्याची माहिती देणे अपेक्षित होते; तसेच ललित ‘एक्स-रे’साठी खाली काळे यांच्यासोबत गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर देखील दोघांनी तो का परत येत नाही याची खात्री केली नाही. तसेच त्याला कैदी वॉर्डमधून बाहेर काढताना पुरेशी खबरदारी घेण्यात आली नाही. दोघांना कायद्याचे ज्ञान असतानाही त्यांनी अक्षम्य असा हलगर्जीपणा करून कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे; तसेच दोघांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे सिद्ध होत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

या दोघांच्या वर्तणुकीमुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसांत मलिन झाल्याने त्यांना खात्यातून बडतर्फ करण्यात आल्याचे अपर पोलिस आयुक्त प्रशासन अरविंद चावरिया यांनी म्हटले आहे. शिक्षेच्या विरोधात या दोन्ही कर्मचाऱ्यांना ६० दिवसांमध्ये अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे अपील करता येणार आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न..

ललित पाटील पलायन प्रकरणानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ललित पाटील याने हिसका देऊन पळाला अशी बतावणी केली होती.

पोलिस बडतर्फ, ‘ससून’च्या अधिष्ठातांवर कारवाई कधी?

ललित पाटील प्रकरणात पोलिस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पोलिस प्रशासनानेही या घटनेला जबाबदार असणाऱ्या ५ पोलिसांना बडतर्फ केले. मात्र, ‘ससून’च्या एकाही अधिकारी-कर्मचाऱ्यावर अशाप्रकारे कारवाई झालेली नाही. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर किरकोळ कारवाई करीत त्यांचे सोलापूर येथे पुनर्वसन केले; मात्र ड्रग्ज तस्कर ललित पाटीलवर ते स्वत: उपचार करीत होते. त्यांनीच वारंवार ललितचा रुग्णालयातील मुक्काम वाढवला होता. याबाबत त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झालेली नसल्याने, ठाकूर यांचा पाठीराखा कोण, ‘ससून’च्या अन्य कुणावरच अशाप्रकारे कारवाई का नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोर्शे अपघात प्रकरणात देखील ‘ससून’च्या दोन डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न झाला, त्याप्रमाणे ललित पाटील प्रकरणात संबंधित डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Who is saving the responsible officers in 'Sassoon' in Lalit Patil case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.