Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:20 PM2024-08-23T17:20:51+5:302024-08-23T17:22:05+5:30
आमच्या पक्षाला निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात स्वारस्य नाही
पुणे : निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात आमच्या पक्षाला स्वारस्य नाही, सत्ता परिवर्तन होणे हे मला महत्त्वाचे वाटते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. बदलापूरसारख्या घटना वारंवार घडत आहेत, त्यासंदर्भात असलेल्या जनभावना व्यक्त करण्यासाठी म्हणून बंद आहे, त्यात कसलेही राजकारण नाही, असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
पुण्यात मुक्कामी आले असताना, मोदी बागेतील निवासस्थानी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी राज्य सरकारने अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जावरही टीका केली. सत्तेत किंवा सत्तेबरोबर असणाऱ्यांच्या कारखान्यांना मदत केली गेली. राज्य सरकार अडचणीत आलेल्यांना मदत करताना नीती ठरवते. आता नीती ठरली, मात्र मदत फक्त सत्तेत असणाऱ्यांच्या कारखान्यांना केली गेली. यापूर्वी असे कधीही होत नव्हते. सरकारमध्ये मंत्र्यांकडून शपथ घेतली जाते. त्यावेळी मी निर्णय घेताना त्यामध्ये न्याय विचार करेल, असे म्हटले जाते. अडचणीत असलेल्यांना मदत करताना त्यात राजकारण आणले जात असेल, तर तो त्या शपथेचा एकप्रकारे भंगच आहे, असे पवार म्हणाले.
महाविकास आघाडीतच असलेल्या उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री कोण ते ठरवा, असे म्हटले आहे. याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार म्हणाले, मुख्यमंत्री कोण असावा यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वारस्य नाही. आत्ता सत्ता परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. उत्तम प्रशासन देत राज्याचा विकास करणे, यासाठी सत्ता परिवर्तन हवे. त्यामुळे पर्याय कसा देता येईल, यालाच महत्त्व द्यायला हवे.
राज्यात अनेक ठिकाणी तुमच्याकडे येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तसे जाहीर केले जात आहे, तुमच्या भेटीसाठी अनेकजण येत आहेत, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मी अनेक वर्षे अनेकांबरोबर काम केले आहे. त्यामुळे भेटीगाठी होत असतात. त्यात बाकीचे काही असतेच असे नाही. ३ सप्टेंबरला मी कोल्हापूरला जात आहे. तिथे जाहीर सभा घेण्याचा माझा विचार आहे. त्यात काही गोष्टी उघड करू, असे पवार यांनी सांगितले.
बदलापूर आंदोलकांमध्ये बदलापूरचे कोणीही नव्हते, बाहेरून आलेले लोक होते, अशी टीका करत पोलिस लोकांवर गुन्हे दाखल करत असल्याचे लक्षात आणून दिले असता, पवार यांनी, सरकारमधील कोणी असे बोलणे योग्य नाही, असे सांगितले. ही लोकांमधील अस्वस्थता आहे. भावना व्यक्त करायची लोकांची ती पद्धत असते. यात कोणाला राजकारण करायचे असेल, असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.