राष्ट्रवादीचा संस्थापक कोण हे जगजाहीर : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:55 AM2023-10-02T04:55:07+5:302023-10-02T04:55:30+5:30
भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादीत असूच शकत नाहीत, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.
नारायणगाव (जि. पुणे) : महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरही राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील बंडखोरांना टोला लगावला. निवडणूक आयोगाच्या सुनावणीस येत्या ६ ऑक्टोबरला वकिलासह उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करीत, भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादीत असूच शकत नाहीत, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.
पवार हे शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी थांबले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
दिलीप वळसे-पाटील म्हणतात की, शरद पवार माझ्या हृदयात आहेत. यावर पवार म्हणाले की, ज्यावेळी मतदान करण्याची वेळ येईल, तेव्हा कोण कोणाच्या हृदयात आहे हे स्पष्ट होईल. कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यावर आपण भाष्य करणार नाही.