ससूनमधील ड्रग तस्करीमागे राजकीय नेता कोण? कायद्याला वळसे घालत पोखरले आरोग्य खाते
By राजू इनामदार | Published: October 11, 2023 09:31 AM2023-10-11T09:31:39+5:302023-10-11T09:32:13+5:30
बदल्यांसाठी कोण होते आग्रही?...
पुणे : सर्वसामान्य रुग्णांचे तारणहार असलेल्या ससून रुग्णालयाचा वापर ड्रग तस्करीसाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून कारागृहातील कैद्यांवर महिनोन महिने उपचार करण्यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, हा हात नक्की कोणाचा ? कायदे, नियम, संकेत यांना धाब्यावर बसवून आरोग्य खाते पोखरण्यामागे आहे तरी कोण ? असा प्रश्न आता सामान्य जणांकडून विचारला जात आहे.
मोठी साखळी असल्याचा अंदाज
अधिकारी स्वत: च्या बळावर असे प्रकार करणे शक्य नाही, त्यांना हाताशी धरून या संपूर्ण अमली पदार्थ प्रकरणाची सूत्रे कोणी तरी दुसरीच व्यक्ती हलवत असल्याचा अंदाज या प्रकरणाचा तपास करत असलेले काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केला. कारागृहातील कैद्यांना उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात आणणे, तिथेच उपचाराच्या आडून त्याला अनेक महिने ठेवणे, उपचारांसाठी आलेल्या कैदी रुग्णाला बाहेर फिरण्याची मुभा देणे, त्याचे बाहेरचे नेटवर्क त्यांना ससूनमधून वापरू देणे, त्यासाठी अधिकारी मॅनेज करणे, असे अनेक गैरप्रकार ललित पाटील या प्रकरणामुळे उघड झाले आहेत. त्यामुळे यामागे एक मोठी साखळीच कार्यरत असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बदल्यांसाठी कोण होते आग्रही?
ससून रुग्णालयाचे आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर डॉ. संजीव ठाकूर यांना आणण्यात आले. तिथूनच या प्रकराची सुरुवात झाली. बदलीच्या ठिकाणी न जाता डॉ. काळे मॅटमध्ये गेले. तिथे त्यांच्या बाजूने निकाल लागला. त्याला डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याची सुनावणी व्हायची आहे. दरम्यान, ससूनचा कार्यभार ठाकूर यांच्याकडेच राहिला. त्यांना अचानक इथे आणण्यामागे कोण आहे ? कोणी त्यांची शिफारस केली ? डॉ. काळे कोणाला अडचणीचे ठरत होते ? किंवा डॉ. ठाकूर सोयीचे होते का? असे अनेक प्रश्न यात निर्माण झाले आहेत. राज्यातील सत्तेत असलेला एक बडा नेता या अदला-बदलीसाठी आग्रही होता अशी चर्चा आहे.
राजकीय वरदहस्त
ससूनमध्ये साधे उपचार करायचा असतील तरी लगेच त्यासाठी कागद काढावा लागतो, म्हणजे अनेक प्रकारची माहिती लिहून द्यावी लागते. औषधे लागतील तर त्यासाठी ससूनमधील डॉक्टरांचेच प्रिस्किप्शन लागते. असे अनेक अडथळे येथील प्रक्रियेत आहेत. कारागृहातील कैद्याला उपचारासाठी ससूनमध्ये आणण्यामध्ये त्यापेक्षा जास्त अडथळे आहेत. न्यायालयाची परवानगी, कारागृह अधीक्षकांची परवानगी, त्यानंतर प्रत्यक्ष ससूनमधील उपचार अशा बऱ्याच गोष्टी त्यात आहेत. त्या सगळ्या टाळून ललित पाटील इतके महिने तिथेच राहात होता, हे अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय होणे अशक्य आहे, त्यांना तसे करण्यास राज्यातील कोणीतरी बड्या राजकीय नेत्याने सांगितले असावे, असेही या प्रकरणात बोलले जात आहे.
अधिकाऱ्यांचे मौन
ललित पाटील याच्यावर ससूनचे अचानक बदली होऊन आलेले, मॅटने विरोधात निकाल देऊनही तिथेच राहिलेले खुद्द अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हेच उपचार करत होते. त्याशिवाय ससूनमध्येच असलेला त्यांचा मुलगा डॉ. अमेय हाही ललित पाटीलवर उपचार करत होता. आता हा ललित पळून गेल्यापासून दोन्ही डॉ. ठाकूरांनी मौन बाळगले आहे. या संपूर्ण प्रकरणात ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे तर या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे.
मंत्र्याने साधली चुप्पी
ललित पाटील ससूनमधून उघडपणे पळून गेल्यानंतर आता आणखी बरेच काही घडले आहे, मात्र, तरीही यावर ना आरोग्यमंत्री तानाजी सावंत बोलायला तयार आहेत, ना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ. गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर चुप्पी साधली आहे. यातील तानाजी सावंत तर पुण्याच्या शेजारीच असलेल्या उपनगरांमध्ये येऊन गेले तरीही त्यांनी ससूनमध्ये येण्याचे व त्यावर काही बोलायचेही टाळले.
खरा सूत्रधार मंत्री कोण ?
काँग्रेसचे आ. रवींद्र धंगेकर यांनीही या सर्व प्रकरणात राज्यातील एका मंत्र्याचा हात असल्याचा जाहीर आरोप केला आहे. त्याची माहिती येत असून कागदपत्रे हातात येताच नाव उघड करू असे त्यांनी ससूनमध्येच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्र्याच्या हस्तक्षेपाशिवाय इतक्या मोठ्या गोष्टी होणे शक्य नाही, अधिकाऱ्यांनीही त्यात हात धुऊन घेतलेे, मात्र मूळ कुठे आहे ते शोधायला हवे, ते शोधा अशी मागणीच त्यांनी पोलिसांकडे केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंबईत बोलताना राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यावर त्यांच्या कॉलमुळेच ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करून घेतले, असा आरोप केला. भुसे यांनी याचा तातडीने इन्कार केला व अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. दरम्यान, यामुळे या संपूर्ण प्रकरणात कोणी ना कोणी राजकीय नेता गुंतला आहे हेच पुढे येत आहे.