Kasba By Elelction: कसब्यातील पराभवाचा ठपका कोणावर? ‘हू इज धंगेकर?’ मतदारांना भावला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 03:14 PM2023-03-17T15:14:41+5:302023-03-17T15:15:26+5:30
पराभवाची जबाबदारी पालकमंत्री पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक की आणखी कोणी? किंवा एखाद्या गटावर टाकण्यात येणार
राजू इनामदार
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे पोस्टमार्टेम झाले असून अहवालही तयार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले. या पराभवाचा ठपका कोणावर ठेवला जाणार, कोण बळीचा बकरा होणार, अशी चर्चा भाजपच्या गोटात जोर धरत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या निवडणुकीत रस घेतला होता. त्यांनी स्वत: पुण्यात येऊन उमेदवार हेमंत रासने यांच्याबरोबर चर्चा केली हाेती. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांचीही भेट घेतली. या दोन्ही भेटीच्या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतरच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बरोबर घेत मतदारसंघात जोर लावला, तरीही पराभव झाला, तोही तब्बल १० हजार मतांच्या फरकाने. केंद्रीय नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याने तर याला पुष्टीच मिळाली आहे.
स्वत: फडणवीस यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रचाराविषयी सूचना दिल्या होत्या. संपूर्ण यंत्रणेची आखणी करून दिली होती. घराघरात आपला कार्यकर्ता गेलाच पाहिजे, असे सांगितले होते; तरीही इतक्या मोठ्या फरकाने पराभव झाल्याने खुद्द फडणवीस हेही चकित झाले आहेत. याचा सरळ अर्थ पोस्टमार्टेम अहवालात पक्षातील दुसऱ्या फळीतील यंत्रणेने काम केले नाही, असा काढण्यात आला असल्याची माहिती मिळाली. त्याला अनुसरून फडणवीस अधिक माहिती घेत असल्याचे समजते.
पालकमंत्री पाटील यांच्यासंदर्भातही नाेंद
पोस्टमार्टेम अहवालात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भातही काही नोंद केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: ‘हू इज धंगेकर?’ हा त्यांचा भर सभेतील प्रश्न मतदारांना भावला नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी पालकमंत्री पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक की आणखी कोणी? किंवा एखाद्या गटावर टाकण्यात येणार, याविषयी जोरदार चर्चा आहे.