‘ फॅशन स्ट्रीट’च्या आगीमागील सूत्रधार कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:36+5:302021-03-28T04:10:36+5:30
पुणे : फॅशन स्ट्रीट मार्केटला आग लागली की लावली, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण काही दिवसांपुर्वीच ...
पुणे : फॅशन स्ट्रीट मार्केटला आग लागली की लावली, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण काही दिवसांपुर्वीच छत्रपती शिवाजी मार्केटला आग लागली होती. त्यानंतर या मार्केटमध्ये आग लागून शेकडो दुकाने खाक झाली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला या जागेत व्यावसायिक संकुल उभा करायचे आहे, तसा ठराव देखील मंजूर झालेला आहे. पण अधिकृत गाळेधारकांनी त्याला विरोध केला. म्हणून कदाचित ही आग लावली गेली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चारशेहून अधिक विक्रेते रस्त्यावर आली असून, त्यांच्या समोर आता फक्त दुकानाची राखच राहिली आहे. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक बाजू कमकुवत झाली होती, त्यात या आगीने भर घातली आहे.
फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये अधिकृत ४४८ विक्रेत्यांची नोंद आहे. त्यानंतर इतरही अनधिकृत असे दोनशहून अधिक विक्रेते आहेत. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देखील बोर्डाकडून गाळे उपलब्ध करून दिले गेले. त्यामुळे येथील गर्दी वाढली, असे एम. जी. रोड हॉकर्स ॲण्ड पथारे सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲड. म. वि. अकोलकर यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘फॅशन स्ट्रीटमध्ये एकच वीज मीटरला परवानगी असताना बोर्डाकडून महावितरणला इथे मीटर लावण्यास परवानगी दिली. त्यामुळे वायरींगचे जाळे वाढले. याबाबत आम्ही महावितरणकडे तक्रारही दिली होती. पण त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. आम्ही अधिकृत गाळेधारक असल्याने आम्हाला हटविण्यासाठीच ही आग लावली गेली असणार आहे. कारण इथे व्यावसायिक संकुल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी बोर्ड प्रयत्न करत आहे. मार्केट रात्री बंद असते. मग आग लागतेच कशी ? आता शेकडो जणांचे दुकाने खाक झाली. लॉकडाऊनमुळे आधीच आथिर्क कंबरडे मोडले होते. त्यात या आगीने भरच घातली आहे. शेकडो संसार आता उघड्यावर आली आहेत. त्यांनी जगायचे कसे ? पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार करून त्यांना मदतीसाठी विनंती करणार आहोत. कारण बोर्ड तर आम्हाला काहीच मदत करणार नाही.’’
————————-
गेल्या दोन वर्षांपासून बोर्ड प्रशासन अधिकृत गाळेधारकाकडून भाडे घेत नाही. दररोज ५ रूपये याप्रमाणे महिना दीडशे रूपये भाडे येथील गाळेधारकांना आहे. पण बोर्डाचे येथे काहीच लक्ष नाही. आता तर आगीत सर्व खाक झाले. त्यामुळे शेकडो विक्रेते काय करणार ?
- ॲड. म. वि. अकोलकर, अध्यक्ष, एम. जी. रोड हॉकर्स ॲण्ड पथारे सेवा संस्था
—————