नवे प्रशासकीय कारभारी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:42 AM2018-03-27T02:42:37+5:302018-03-27T02:42:37+5:30
पुण्याचे विभागीय आयुक्त सेवानिवृत्त होणार असून, महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली झाली
पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त सेवानिवृत्त होणार असून, महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली झाली; तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकालही संपुष्टात आला आहे. पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाºया या तीनही पदांवर नवीन अधिकारी पाहायला मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे पुण्याचे नवीन प्रशासकीय कारभारी कोण होणार, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या सधन आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विभागीय आयुक्तपदी बदली व्हावी, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे काही दिवसात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्तपदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दळवी यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाºया जागेवर एखादा ज्येष्ठ अधिकारी बदलून येणे अपेक्षित आहे. पुण्यात राज्यस्तरावरील अनेक कार्यालये आहेत. त्यामुळे या कार्यालयांमधील एखादा अधिकारी बदलून येणार की पुण्याबाहेरील अधिकारी विभागीय आयुक्त म्हणून बदलून येणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात गृह विभागाच्या सहसचिवपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या बदलीमुळे पालिका आयुक्त पद रिक्त झाले आहे. पुणे महानगर पालिकेअंतर्गत ‘स्मार्ट सिटी’, मेट्रो, नदी सुधार योजना असे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्यामुळे पालिकेसाठी सक्षम अधिकाºयाची आवश्यक ता आहे. या पदावर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु राज्य शासनाकडून कोणत्या अधिकाºयाची बदली पालिकेत केली जाईल, याकडे प्रशासकीय अधिकाºयांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.
सर्वसाधारणपणे आयएएस दर्जाच्या अधिकाºयाची बदली तीन वर्षांनी होत असते; मात्र तुकाराम मुंडे यांची बदली वर्षभरातच झाली. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पुण्यात गेल्या महिन्यातच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे राव यांचीही बदली निश्चित मानली जात आहे.
केवळ पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामामुळे अद्याप
राज्य शासनाकडून त्यांच्या बदलीबाबत हालचाली झालेल्या नाहीत. सौरभ राव यांची बदली विभागीय आयुक्तपदी किंवा पालिकेच्या आयुक्तपदी होईल,
अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आहे; तसेच राव
यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर कोण येणार, याबाबतही उत्सुकता आहे.
मार्च महिन्यात सर्व अधिकाºयांच्या बदल्या होतात. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर संबंधित अधिकाºयांच्या बदल्या होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.