मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:33 AM2017-12-10T03:33:24+5:302017-12-10T03:33:27+5:30
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जोपासलेल्या बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावावर काही तासांमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/नागपूर : महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जोपासलेल्या बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावावर काही तासांमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे. मतदान प्रक्रिया शनिवारी संध्याकाळी ५ वाजता संपली. आज रविवारी दुपारी २ पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी नवीन संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर करण्याची शक्यता असून संमेलनाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले आहे.
आरोप-प्रत्यारोप, एकगठ्ठा मतदान, साहित्य संस्थांनी काढलेले फतवे, आयोजक संस्थेची निर्णायक मते या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संमेलनाध्यक्ष कोण, याचा फैसला आज होणार आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ८९६ मतपत्रिका पोचल्या होत्या. विदर्भ साहित्य संघातून सर्वाधिक १७५ मतपत्रिका प्राप्त झाल्या, तर मुंबई मराठी साहित्य संघातून केवळ १२२ मतपत्रिका पोहोचल्या होत्या.
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होत आहे. दोन उमेदवारांनी विजयाची आशा आधीच सोडून दिली असून, एका उमेदवाराने शेवटच्या टप्प्यात सर्व हालचाली थांबवल्याची चर्चा साहित्यवर्तुळात सुरु आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाची लढत प्रत्यक्षात दुहेरी झाल्याची चर्चा आहे. आयोजक संस्थेची एकगठ्ठा मते एका विशिष्ट उमेदवारालाच मिळतील हा भ्रम आता दूर झाला असून आयोजक संस्थेच्या मतांचीही विभागणी झाल्याचे समोर आले आहे.
मतदानाची ही विभागणी कुणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत बृहन्महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत विशेष उत्साह आहे. त्यांनी आपला कौल कुणाला दिला, हेही या निकालातून स्पष्ट होणार आहे.
दुपारी दोनपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
मतपत्रिका : पूर्वाध्यक्ष ११, महाकोश निधीचे विश्वस्त ८, महाराष्ट्र साहित्य परिषद १५७, विदर्भ साहित्य संघ १७५, मुंबई मराठी साहित्य संघ १२२, मराठवाडा साहित्य परिषद १६७, मराठी साहित्य परिषद तेलंगणा ३१, मध्यप्रदेश साहित्य संघ, भोपाळ ३६, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी ३७, कर्नाटक राज्य मराठी साहित्य संघ, गुलबर्गा ४४, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद छत्तीसगड ३९, मराठी वाङ्मय परिषद बडोदे ८, निमंत्रक संस्था ५७, उमेदवार २.