कोथरूड मतदारसंघात उभारलेले जनसवांद कट्टे कोणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:29+5:302021-07-18T04:09:29+5:30
कर्वेनगर : कोथरूड विधानसभा प्रभाग क्रमांक १२, ३१, १३ मधील महापौर आणि नगरसेवक यांच्या पुणे पालिका निधीतून वाचनालय, ज्येष्ठ, ...
कर्वेनगर : कोथरूड विधानसभा प्रभाग क्रमांक १२, ३१, १३ मधील महापौर आणि नगरसेवक यांच्या पुणे पालिका निधीतून वाचनालय, ज्येष्ठ, नागरिक कट्टा, जनसंवाद कट्टा असे अनेक कट्टे उभारण्यात आले आहेत. या कट्टे आणि वाचनालयावर पुणे पालिकेचे चिन्ह किंवा लोगो दिसत नसल्याने हे कोणत्या महापालिकेचे आहेत, असा सवाल राष्ट्रवादीचे केदार मारणे यांनी महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारला आहे.
पुणे महापालिकेच्या जागेत म्हणजे रोडलगत फुटपथावर हे कट्टे उभारले आहेत. डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर होम कॉलनी श्रमिक वसाहत, डी. पी. रोड, शैलेश सभागृह शेजारी, एरंडवणे गावठाण, म्हात्रे पुलाशेजारी अशा विविध ठिकाणी पुणे पालिकेच्या नगरसेवकांच्या निधीतून या वास्तू उभारल्या आहेत. परंतु या वास्तूवर पुणे महापालिकेचे कुठलेही नाव नाही. तसेच पुणे पालिकेचा लोगोही दिसत नाही. त्यामुळे हे नगरसेवक, महापौर नक्की महाराष्ट्रातील २७ महापालिकांपैकी कोणत्या महापालिकेचे आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भाजपला पुणे महापालिकेच्या लोगोची लाज वाटते का? म्हणून संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे उपाध्यक्ष केदार मारणे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांचा हितासाठी ही विकासकामे केली असून आमची संकल्पना आणि पालिका निधीमधून त्यासाठी खर्च झाला आहे. काही चूक असेल तर तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.
- दीपक पोटे,नगरसेवक, पुणे महापालिका