कुणी छोटीशी का होईना भूमिका देता का भूमिका? पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांची आर्त विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 08:05 PM2018-01-18T20:05:18+5:302018-01-18T20:05:49+5:30
’कुणी काम देता काम, एक कलाकार छोटी भूमिका मिळण्यासाठी तडफडतोय....आयुष्यभर तोंडाला मेकअप लावला...घरदार विसरून संपूर्ण आयुष्य कलेला समर्पित केले. पण आता या वयात आम्हाला कुणी ओळखत नाही हा एक शापच असल्यासारखे वाटते. आम्हाला आयुष्याच्या शेवटी मानानं जगायचयं...कुणापुढे हात पसरायचा नाहीए...म्हणूनच काम हवयं, आज पुण्यात नाट्य निर्माते आणि नाट्यसंस्था राहिलेल्या नाहीत.
- नम्रता फडणीस
पुणे : ’कुणी काम देता काम, एक कलाकार छोटी भूमिका मिळण्यासाठी तडफडतोय....आयुष्यभर तोंडाला मेकअप लावला...घरदार विसरून संपूर्ण आयुष्य कलेला समर्पित केले. पण आता या वयात आम्हाला कुणी ओळखत नाही हा एक शापच असल्यासारखे वाटते. आम्हाला आयुष्याच्या शेवटी मानानं जगायचयं...कुणापुढे हात पसरायचा नाहीए...म्हणूनच काम हवयं, आज पुण्यात नाट्य निर्माते आणि नाट्यसंस्था राहिलेल्या नाहीत. कुणीही आम्हाला कार्यक्रमांनाही बोलवत नाही....सांगा आम्ही कसं जगायचं....ज्या कलाकारांनी एकेकाळी रंगभूमी गाजवून रसिकांचे कलाविश्व समृद्ध केले. त्या पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
एरवी या कलाकारांना वयोमानामुळे एकत्र येणे दुरापास्त आहे. पण नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या स्नेहमेळाव्यात ही काहीशी दुर्लक्षित झालेली ज्येष्ठ मंडळी एकमेकांच्या सहवासात वेळ घालवून आयुष्याला उभारी देण्याचा प्रयत्न करतात. या स्नेहमेळाव्यादरम्यान काही ज्येष्ठ कलाकारांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या व्यथा ’लोकमत’ समोर मांडल्या. ’राजकारण गेलं चुलीत’, रखेली’ सारख्या नाटकांपासून सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेणा-या प्रतिभावंत कलाकार ज्योती चांदेकर म्हणाल्या, आज पुण्यात अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांना काम मिळत नाही. आयुष्य कलेला वाहिले पण उतरत्या वयात आम्हाला कला क्षेत्रातील कुणीच विचारत नाही अशी परिस्थिती आहे. पुण्यात नाट्यनिर्माते आणि संस्थाही आता राहिलेल्या नाहीत. साधे नाट्य संमेलन किंवा कार्यक्रमांनाही आम्हाला निमंत्रण दिले जात नाही. अगदी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडूनही आम्हाला आमंत्रण नसतात. पुण्यातील कलाकारांना असे वाळीत टाकू नका. ज्यांनी ‘गाढवाचं लग्न’सारख्या लोकनाट्यातून रसिकांच्या चेह-यावर हास्य फुलविण्याची मोलाची भूमिका बजावली त्या ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनीही ज्योती चांदेकर यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आम्हाला काम नाही मग आम्ही करायचे तरी काय? पुण्याच्या कलाकारांकडे सावत्र मुलाच्या भावनेतून पाहिले जाते असे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुहासिनी देशपांडे म्हणाल्या, काही कलाकार आज दिल्लीची पेन्शन घेत आहेत. पण ती कशी मिळवायची त्याची प्रक्रिया काय आहे हे आम्हाला माहिती नाही. त्यावर जयमाला इनामदार यांनी मला राज्य शासनाचीही पेन्शन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.आपल्याला कुणी ओळखत नाही हा एक शाप आहे. मुख्य प्रवाहात कार्यरत होतो आता वृद्ध झालो आहोत म्हणून आम्हाला बाजूला करणे योग्य आहे का? अशी भावना श्रीराम रानडे यांनी व्यक्त केली. आसावरी तारे हिने देखील काम आणि मानधन मिळत नसून, लावणीचे कार्यक्रमही कमी झाले आहेत त्यामुळे आॅक्रेस्ट्रामध्ये गावे लागत आहे. जे स्वत:च्या नावाने ओळखले जातात त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट केले.