...या पुअर शोला जबाबदार कोण?
By admin | Published: April 12, 2017 04:05 AM2017-04-12T04:05:05+5:302017-04-12T04:05:05+5:30
महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या मोशी, प्राधिकरण येथील वसतिगृहाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी
पिंपरी : महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या मोशी, प्राधिकरण येथील वसतिगृहाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी आयोजकांना मंत्र्यांनी कानपिचक्या दिल्या. ‘मागासवर्गीयांची मुले शिकावीत, पुढे जावीत म्हणून त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो, वसतिगृह उभारतो, उद्घाटनाला मोठ्या नेत्यांना बोलवितो आणि एवढे करून कार्यक्रमाला लोकच नाहीत. त्यातूनच आमच्या सामाजिक न्याय विभागाचा मागासलेपणा दिसून येतो. माणसे जमा करता येत नाहीत, तर या पुअर शोला जबाबदार कोण, असा सवाल बडोले यांनी केला.
महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागातर्फे मोशी, प्राधिकरण येथे उभारण्यात आलेल्या अडीचशे विद्यार्थी क्षमता असलेल्या मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, क्रेडाईचे अनिल फरांदे आदी उपस्थित होते.
बडोले म्हणाले, ‘‘गरीब, मागासवर्गीय माणसांना मोजता येणार नाही, एवढे करोडो रुपये खर्चून त्यांच्या मुलांसाठी सामाजिक विभाग विविध सोयी, सुविधा देत आले आहे. पण, त्याचे म्हणावे तितके मार्केटिंग झाले नाही. वसतिगृहाच्या उद्घाटनाला मंत्री, आमदार, महापौरांना बोलावितो. मात्र, लोकच नाहीत. हा आमच्या विभागाचाच मागासलेपणा आहे. निदान विद्यार्थ्यांना तरी बोलवायला हवे.’’
प्रादेशिक आयुक्त ए. बी. महाजन यांनी प्रास्ताविक केले. माया
ननावरे यांनी सूत्रसंचालन केले. अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
- बडोले म्हणाले, ‘‘बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ५० स्मृतिस्थळांचा विकास करणार असून, त्यातील २८ स्थळांचा विकास सुरू आहे. त्याचप्रमाणे निवडक दलित वस्त्यांचाही विकास करण्यात येणार आहे.’’