मोदी मंदिर हटवण्याची सूचना केली कुणी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:13 AM2021-08-20T04:13:48+5:302021-08-20T04:13:48+5:30
पुणे : “जिवंत व्यक्तीचे मंदिर बांधणे पक्षशिस्तीत बसत नाही. त्यामुळे हे मंदिर तत्काळ हटवण्याची सूचना आम्हाला वरिष्ठांनी केली. त्यानुसार ...
पुणे : “जिवंत व्यक्तीचे मंदिर बांधणे पक्षशिस्तीत बसत नाही. त्यामुळे हे मंदिर तत्काळ हटवण्याची सूचना आम्हाला वरिष्ठांनी केली. त्यानुसार आम्ही मंदिरातील मोदींची मूर्ती काढली आहे. कोणी टीका केली म्हणून आम्ही मूर्ती काढली नाही,” असे स्पष्टीकरण मोदीभक्त मयूर मुंडे यांचे वकील ॲड. मधुकर मुसळे यांनी दिले आहे.
औंध येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मुंडे यांनी मुख्य रस्त्याच्या कडेलाच मंदिराची उभारणी केली होती. ॲड. मधुकर मुसळे हे औंध येथील भाजपा नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती आहेत. हे मंदिर मुंडे यांनी बांधले असले तरी पडद्यामागे ॲड. मुसळे हेच असल्याचे सांगितले जात होते. मोदी मंदिराचीही चर्चा देशभर झाली. त्यामुळ थेट पंतप्रधान कार्यालयातूनही यासंदर्भात कानपिचक्या मिळाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंडे व ॲड. मुसळे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
ॲड. मुसळे म्हणाले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार मोदींची मूर्ती काढली. ही मूर्ती आता नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठेवली आहे. “पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. म्हणून ती मूर्ती यापुढेही आमच्या कार्यालयात राहणार आहे,” असे ते म्हणाले. मोदींचे मंदिर किंवा मोदींची मूर्ती हटवण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातून किंवा अन्य कोणाचा फोन आला का? याबाबत विचारणा केली असता, ‘याबाबत आम्ही काहीही बोलणार नाही,’ असे उत्तर मयूर मुंडे व ॲड. मुसळे यांनी दिले. त्यामुळे कोणत्या नेत्याच्या अथवा कोणाच्या इशाऱ्यावरुन मोदी मंदिराचे विसर्जन झाले हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.