ललित पाटीलला ड्रग्ज कुणी पुरवले? ‘सीसीटीव्ही’त दिसले दोन्ही आरोपी
By नम्रता फडणीस | Published: October 6, 2023 07:33 PM2023-10-06T19:33:35+5:302023-10-06T19:34:25+5:30
मुख्य आरोपीसह नाशिक जिल्ह्यातील दोघांचा शोध सुरू...
पुणे : ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७१ आणि ७४, येरवडा जेलमधील बंदी वॉर्ड क्रमांक १६ आणि बालविकास कॅंटीनमधील सीसीटीव्ही फुटेज गुरूवारी संध्याकाळी प्राप्त झाले आहे. त्या फुटेजमध्ये दोघे आरोपीच्या जवळ दिसले आहे. त्यात दोन्ही आरोपी दिसून येत असून, मुख्य आरोपी ललित अनिल पाटील याला अमली पदार्थ कोणी पुरविला हे शोधण्याचे काम सुरू आहे. ललित याने या दोघांच्या मार्फत आणखी कोणाला अमली पदार्थ विकले आहे का, अन्य कोठे साठा करून ठेवले आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे सुभाष जानकी मंडल व रौफ रहिम शेख या दोघांना आणखी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार ससून ड्रग्स प्रकरणातील दोघांच्या पोलीस कोठडीत 9 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश सत्र न्यायाधीश जे.जी.डोरले यांनी दिला आहे.
दरम्यान, नाशिक येथील आणखी दोघांचा या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे. ललित आणि त्या दोघांचा शोध सुरू आहे. त्यासाठी पथके रवाना झाली आहेत.
सुभाष जानकी मंडल (वय 29, रा. देहुरोड, मूळ. झारखंड) आणि रौफ रहिम शेख (वय 19, रा. ताडीवाला रस्ता) या दोघांना दि. 1 आँक्टोबर रोजी अटक करण्यात आली . त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात मंडल याच्याकडून तब्बल 1 किलो 71 ग्रॅम 53 मिलिग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जप्त माल व्यापारी प्रमाणात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील नितिन कोंघे यांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केलीकोंघे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला.