कुणी परीक्षक देता का परीक्षक?
By admin | Published: February 22, 2015 12:39 AM2015-02-22T00:39:37+5:302015-02-22T00:39:37+5:30
संगीताची वैभवशाली परंपरा असलेल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात राज्यनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून हौशी नाट्य चळवळ जनमानसात रुजविली जात आहे.
नम्रता फडणीस - पुणे
संगीताची वैभवशाली परंपरा असलेल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात राज्यनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून हौशी नाट्य चळवळ जनमानसात रुजविली जात आहे. मात्र, संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये केल्या जात असलेल्या परीक्षणावरच गेल्या काही वर्षांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्पर्धेच्या परीक्षकांची नाळ ही रंगभूमीशी निगडित असावी, त्याच्या सर्व अंगांचे ज्ञान परीक्षकांना असावे, असा सर्वसाधारण निकष आहे. मात्र रंगकर्मींची अनास्था... अनुपलब्धता... या गोष्टींमुळे कुणी परीक्षक देता का परीक्षक? अशी काहीशी दयनीय अवस्था शासनाची झाली आहे. वैयक्तिक माहिती मागवून मुलाखती घेऊन परीक्षकाची निवड करीत वेळ मारून नेली जात आहे. पुढील काळात परीक्षकांसाठी लेखी परीक्षा घेण्याचा विचारही शासनस्तरावर सुरू आहे.
कोणत्याही स्पर्धेचे परीक्षण करणारा परीक्षक हा त्रयस्थ हवा, त्या विषयातला तो ज्ञानी असावा, प्रत्येक सादरीकरणात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा त्रुटी आहेत, याचे विश्लेषण त्याने अधिकारवाणीने व सुसंगत पद्धतीने करावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.
मात्र रत्नागिरीला सलग दोन वर्षे होत असलेल्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये परीक्षकांनी केलेल्या परीक्षणावरच तेथील नाट्यरसिक नाराजीचा सूर व्यक्त करताना दिसत आहेत. यावर्षीचा निकाल तयार होताना नेमके काय झाले, याविषयीच्या चर्चा रसिकांमध्ये घडू लागल्या आहेत. उत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक देताना ज्याला संगीत नाट्यलेखन म्हणजे काय हे कळलेच नाही, अश्लील भाषेचा संगीत नाटकात वापर करून उत्कृष्ट संगीत नाटक लेखन करता येते, असा साक्षात्कार झालेल्या लेखनाला परीक्षकांनी उत्कृष्ट नाट्यलेखनाचे पारितोषिक द्यावे, याचा अर्थ नाटक त्यांना कळले नाही असा घ्यावा का? नवीन संहिता दोनच असल्याने हे झाले का? लेखन पारितोषिक देण्यायोग्य संहिता नाही, असे कळविण्याचा अधिकार शासनाला नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
४खरे तर रसिकप्रेक्षक हे ‘मायबाप’ असतात, म्हणून प्रत्येक रंगकर्मीला या रसिकांचे मत आवर्जून विचारात घ्यावेच लागते. शासनदेखील त्यांच्या मतांमधून काही बोध घेणार का? हा कळीचा मुद्दा आहे, याविषयी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांसाठी परीक्षकच मिळत नसल्याच्या महत्त्वपूर्ण बाबींवर त्यांनी दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
१ रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या मान्यवर व्यक्तींचा परीक्षकासाठी विचार केला जात नाही, असे मुळीच नाही. शासकीय स्पर्धा या जवळपास १९ केंद्रांवर घेतल्या जातात. मात्र, तिथे राहणे फारसे या व्यक्तींना जमत नाही. याशिवाय त्या काळात ते उपलब्ध होतील किंवा नाही हेदेखील सांगता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाच्या स्पर्धांसाठी व्यक्तींची माहिती मागवून, त्यांचा अनुभव बघितल्यानंतर मुलाखतीतून त्यांची निवड केली जाते. त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतल्या जातात. शेवटी हा उपक्रम शासनाचा जरी असला तरी त्याला सर्वांचे
सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
२ संगीत नाटकांचे परीक्षण करणारे लोक सहजासहजी मिळत नाहीत, याला ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका कीर्ती शिलेदार यांनीही दुजोरा दिला. गेल्या काही वर्षांपासून संगीत नाट्य स्पर्धेसंदर्भात परीक्षकांबद्दलच्या चर्चा खूप होत आहेत.
३मुळातच संगीत नाटकांचे परीक्षण करण्यासाठी साहित्य आणि संगीत या दोन्हींचा अभ्यास असलेला व्यक्ती पाहिजे, जे मिळणे कठीण आहे. यातच संगीत नाटकांचे परीक्षण हे संवेदनशीलतेने होणे अपेक्षित आहे. आमच्यासारख्या व्यक्तींना एक ते दोन महिने त्या भागात जाऊन राहणे म्हणावे तितके शक्य होत नाही.