Savitri Bai Phule: सावित्रीबाई फुले कोण होत्या? पुणे विद्यापीठातील नवी पिढीच अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 02:18 PM2023-01-03T14:18:32+5:302023-01-03T14:20:06+5:30
सावित्रीबाई फुलेंच्या आभाळाएवढ्या कामाबद्दल आजही अज्ञान
मानसी जोशी/किमया बोराळकर
पुणे: आद्य स्त्रीशिक्षक असलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज (दि.३) १९२ वी जयंती. पती ज्योतिराव फुले यांच्या पावलांवर पाऊल टाकत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी स्वत:ला समर्पित केले. ज्योतिरावांनंतरही त्या मूळ गावी जाऊन काम करत होत्या. त्यानंतर पुण्यात प्लेगची साथ आल्यावर पुन्हा पुण्यात येऊन त्यांनी प्लेगच्या रुग्णांच्या सेवेत स्वत:ला जुंपून घेतले व त्यातच त्यांचे निधन झाले.
अशा सावित्रीबाईंविषयी नव्या पिढीला काहीही विशेष माहिती नाही हे धक्कादायक वास्तव आहे. त्यांच्याच नावे असलेल्या सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठातील उच्च शिक्षण घेणाऱ्या युवतींशी संपर्क साधल्यानंतर हे विशेषत्वाने जाणवले. सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षक होत्या. यापुढे त्यांच्या माहितीची गाडी जात नाही. अनेकींना तर त्यांचे मूळ गाव कोणते, त्यांचा काळ, मुलींना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी काय कष्ट घेतले याची माहितीच नाही.
प्रश्न : सावित्रीबाई फुले कोण होत्या? आणि त्यांच्या कार्याची माहिती आहे का?
-सावित्रीबाई या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मात्र, अन्य कार्याबद्दल काही कल्पना नाही.
- तरुणी (एलएलबी)
प्रश्न : सावित्रीबाई फुलेंची ही कितवी जयंती आहे?
-माफ करा, मला निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु, माझ्या अंदाजानुसार शंभरावी किंवा एकशे पंचविसावी असावी.
- तरुण ( विज्ञान शाखा)
प्रश्न : सावित्रीबाई फुले या कवयित्रीही होत्या. त्यांची एखादी कविता माहिती आहे का?
-त्या कवयित्री होत्या हे मला तुमच्याकडूनच माहिती होत आहे. खरे आहे का?
- तरुणी (परदेशी भाषा विभाग )
प्रश्न : सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाशिवाय विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सती प्रथा या समाजविघातक चालीरीती बंद करण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे याविषयी काही कल्पना आहे का?
-शाळेत असताना इतिहासाच्या अभ्यासक्रमात बालविवाहाबद्दल वाचल्याचे आठवते, पण सती प्रथा, विधवा पुनर्विवाह याबद्दल काहीच माहिती नाही.
- तरुण (कला शाखा )
प्रश्न : पुण्यात सन १८९६ मध्ये प्लेगची साथ आली होती. रुग्णांच्या सेवेदरम्यान सावित्रीबाईंचा मृत्यू झाला होता. त्यांच्या या मोठ्या योगदानाबद्दल माहिती आहे का?
-पुण्यात प्लेगची साथ आली होती याची माहिती आहे, पण सावित्रीबाईंनी त्यात काय काम केले याविषयी वाचनात आले नाही.
- तरुणी (ललित कला केंद्र )
विद्यापीठच जबाबदार
या स्थितीला निश्चितपणे शालेय तसेच महाविद्यालयीन विभागच जबाबदार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाविषयी तर बोलायलाच नको. त्यांना अथर्वशीर्षावर अभ्यासक्रम तयार करता येतो, पण सावित्रीबाईंचे जीवनकार्य समोर आणावे असे काही वाटत नाही. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर यासाठी अभ्यासक्रमातच माहिती उपलब्ध करून द्यावी. - बाबा आढाव (ज्येष्ठ समाजसुधारक, अध्यक्ष महात्मा फुले समता प्रतिष्ठान.)