SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी काेणाची वर्णी लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:04 AM2023-04-27T09:04:52+5:302023-04-27T09:05:37+5:30
आयआयटी पवई येथे हाेणार मुलाखती...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या प्राध्यापकांना कुलगुरू निवड समितीने मंगळवारी मुलाखतीसाठी पत्र पाठवले आहे. आयआयटी, पवई येथे १८ आणि १९ मे राेजी पहिल्या टप्प्यातील प्राथमिक मुलाखती पार पडणार आहेत. दरम्यान, कुलगुरू निवड प्रक्रियेत पुणे विद्यापीठातील प्राध्यापक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ मे २०२२ मध्ये संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. त्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यात कुलगुरू निवड समिती स्थापन केली. भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अभय करंदीकर, दीपक कपूर, डॉ. मीना चंदावरकर (यूजीसी प्रतिनिधी) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले हाेते. दि. ३० मार्चअखेर ९० अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यांतील १६ व्यक्ती पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील हाेत्या.
पुणे विद्यापीठातून प्र. कुलगुरू डाॅ. संजीव साेनवणे, मानवशास्त्र विभागप्रमुख आणि स्कूल ऑफ ह्युमन स्टडीजच्या संचालक डाॅ. अंजली कुरणे, संरक्षणशास्त्र विभागप्रमुख डाॅ. विजय खरे तसेच डाॅ. संजय ढाेले यांची प्राथमिक फेरीतील मुलाखतीसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये आणखी काही नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सादरीकरण, व्हिजन, संवाद असे मुलाखतीचे स्वरूप असणार आहे. पहिल्या फेरीतून पाच नावांची राज्यपालांकडे शिफारस केली जाईल. राज्यपाल त्यांपैकी एकाची कुलगुरुपदावर नियुक्ती करणार आहेत. साधारण जून महिन्यात विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणार आहेत.