‘सोमेश्वर’ची कृपा कोणावर होणार?
By admin | Published: April 16, 2015 11:01 PM2015-04-16T23:01:41+5:302015-04-16T23:01:41+5:30
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्याला चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी पुन्हा तडा दिला.
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्याला चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी पुन्हा तडा दिला. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूकदेखील अजित पवार यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. मागील निवडणुकीपेक्षा शेवटच्या टप्प्यात १० ते १२ टक्के जास्त झालेले मतदान ‘राष्ट्रवादी’ पुरस्कृत पॅनलला धडकी भरविणारे आहे, अशी चर्चा होती. यंदाची निवडणूक काकडे गटासाठी महत्त्वाची ठरली आहे. सर्व काकडे कुटुंब या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याने निवडणुकीतील चुरस वाढली. राष्ट्रवादीच्या पॅनलला कडवे आव्हान उभे केले आहे.
बारामती, लोणंद, खंडाळा व पुरंदर या तालुक्यांतील जिरायती भाग असे मोठे कार्यक्षेत्र असलेला सोमेश्वर कारखाना कथित गैरव्यवहार प्रकरणामुळे गाजला. या गैरव्यवहाराभोवतीच कारखान्याचा प्रचार झाला. त्याबरोबर खासगी कारखान्यांना अजित पवार यांनी प्रोत्साहन दिल्याने सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आली आहे, असा प्रचाराचा रोख काकडे यांचा होता. त्याला प्रत्युत्तर देत असताना बारामतीत कारखानदारी येणार नाही, याबाबत अजित पवार यांना सातत्याने सांगावे लागले. प्रत्येक निवडणुकीला काकडे कुटुंबातील कोणी तरी महत्त्वाचा नेता पवार यांच्यासोबत असतो. या निवडणुकीत मात्र काकडे कुटुंब एकवटले. मोठे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वरच्या निवडणुकीत १६ हजार ३६८ पैकी १४ हजार ९८९ ऊसउत्पादक मतदारांनी मतदान केले. मतांची टक्केवारी ९१.५८ टक्के होती. विक्रमी मतदान झाले. माळेगाव कारखान्याची सत्ता गेल्यानंतर ‘सोमेश्वर’साठी अजित पवार यांनी स्वत: विशेष लक्ष दिले आहे. त्यांंनी तब्बल ५ ते ६ दिवस तळ ठोकून कार्यक्षेत्र पिंजून काढले आहे.
१९९२ पर्यंत काकडे कुटुंबांची सत्ता ‘सोमेश्वर’ कारखान्यावर होती. त्यानंतर पवारांच्या पॅनलने आतापर्यंत सत्ता मिळविली. मागील दोन-तीन वर्षांच्या काळातील कथित गैरव्यवहार प्रकरण, आर्थिक घोटाळे, कारखान्यावरील कर्जाचा डोंगर आदी कारणांमुळे अपेक्षित दर ऊसउत्पादकांना मिळाला नाही. त्याची नाराजीदेखील या निवडणुकीत होती. सत्ताधाऱ्यांवर नाराजी असली, तरी सतीश काकडे, प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला प्रचार काळात नियोजनाचा अभाव दिसून आला. मात्र, खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे या सहकार चळवळीतील नेत्यांनीदेखील ‘माळेगाव’प्रमाणे ‘सोमेश्वर’ची सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मागील ७ वर्षांत ऊसदरासाठी सातत्याने सतीश काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले.
शहाजी काकडे यांच्या पवारविरोधी भूमिकेचा फायदा सतीश काकडे यांच्या पॅनलला होणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात असला, तरी क्रॉस वोटिंगचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. अगदी शेवटच्या अर्धा तासात मतांची टक्केवारी वाढली. मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी आले होते. बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी हा या कारखान्याचा मतदार आहेत. सुरुवातीच्या काळात या भागातील शेतकऱ्यांना सभासद करण्यात आले होते. जिरायती भागातील मतदारांचा प्रभाव कारखान्याच्या निवडणुकीत पडतो, हेदेखील आजवर स्पष्ट झाले आहे. पवार यांनी तब्बल १९ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे जुन्यांची नाराजी कायम होती. त्याचबरोबर, काकडे गटाने तोडीस तोड उमेदवार रिंगणात उतरविले. आता बदललेल्या सत्ताकेंद्रांमुळे ‘माळेगाव’ची पुनरावृत्ती ‘सोमेश्वर’ला होईल का, हे मतमोजणीत स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
४सतीश काकडे, चंद्रराव तावरे यांनी ‘सोमेश्वर’चे खासगीकरण करण्याची भीती व्यक्त केली. कारखाने अडचणीत आणून त्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटाच लावला असल्याचा आरोप प्रचारात काकडे, तावरे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी तालुक्यात खासगी कारखाने येणार नाहीत, अशी ग्वाही दिली; परंतु तालुक्यातून खासगी कारखान्यांना ऊस नेला जातो, यावर मात्र त्यांना उत्तर देता आले नाही.
या निवडणुकीत स्थानिक गटबाजी, नाराजी, नातीगोती आदींचा प्रभाव दिसून आला. शेवटच्या टप्प्यात अगदी काही उमेदवारांनी स्वत:साठी मत मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे माळेगावप्रमाणेच ‘क्रॉस’ वोटिंगचा फटका कोणाला बसणार, हेदेखील शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल.