कोण होणार प्रदेशाध्यक्ष : पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:27 AM2018-04-29T11:27:36+5:302018-04-29T11:27:36+5:30
राज्यातील महत्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज होणार आहे.याबाबत राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बैठकीनंतरच्या सभेत नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याने त्यानिवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुणे : राज्यातील महत्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज होणार आहे. या पदासाठी अनेक नावे चर्चेत असून आज दुपारी त्यावर शिक्कमोर्तब होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याने त्यानिवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याबाबत राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बैठकीनंतरच्या सभेत नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. या बैठकीला पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, जयंत पाटील, चित्रा वाघ. सुनील तटकरे, अनिल देशमुख आदींसह विविध भागातील नेते उपस्थित आहेत. दिलीप वळसे पाटील निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून काम बघणार आहेत.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा तीन वर्षांचा कालावधी यापूर्वीच संपुष्टात आला आहे.मात्र पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनामुळे निवड करण्यास काहीसा विलंब झाला आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. विशेषतः नुकत्याच करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात त्यांनी संपूर्ण राज्यात फिरून पक्षाची ताकद आजमावली आहे.शिवाय सोशल मिडिया किंवा प्रत्यक्षातही राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधातल्या प्रत्येक मुदद्यावर बोट ठेवत आहे. ग्रामीण भागासह शहरातही त्यांचे लक्ष असून तिथेही कार्यकर्त्यांना आक्रमक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागाशी जोडलेला पण सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्याची पक्षाला गरज आहे.
अशावेळी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे अशी दोन नावे पुढे येत असून त्यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. सध्या मुंडे यांना प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर हल्लाबोल सभेतील त्यांच्या भाषणांना तसेच सोशल मिडियावरही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच जातीय समीकरणे जुळवण्यासाठी आणि ओबीसी मतपेटीसाठीही त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.दुसरीकडे पाटील हे पक्षात अनुभवी असून त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव जास्त आहे.त्यामुळे त्यांचाही पर्याय खुला आहे.याशिवायही काही नावे डोळ्यासमोर असून शरद पवार हे स्वतःच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अनेक ठिकाणचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षही या बैठकींनंतर जाहीर होणार आहे. मात्र त्यात पुणे आणि सध्या धगधगणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नसल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.